Wednesday, June 7, 2017

संयमाचा कडेलोट

अब आया ऊट पहाडके निचे, अशी एक हिंदी भाषेतली उक्ती वा म्हण आहे. जेव्हा एखादी गोष्ट साफ़ दिसत असतानाही कोणी नाकारत रहातो आणि तिचे दुष्परिणाम त्याच व्यक्तीला भोगायला लागतात व तो गलका करू लागतो, तेव्हा अशी उक्ती वापरली जाते. इंग्लंडच्या विद्यमान पंतप्रधान तेरेसा मे यांच्यावर आता तशीच पाळी आली आहे. गेल्या काही दिवसात तिसरा भयानक जिहादी घातपाती हल्ला त्यांच्या देशात झाला आणि त्यांना नेहमीची गोलमाल भाषा सोडून सत्य बोलायची वेळ आलेली आहे. सध्या इंग्लंडमध्ये निवडणूका लागलेल्या आहेत आणि मोठ्या धडाक्यात प्रचारही सुरू आहे. सर्वच राजकारणी प्रचारात गुंतलेले आहेत. त्यातच क्रिकेटची एक मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धाही चाललेली आहे. मध्यंतरी तिथे एका क्रिडा सामन्यातच स्फ़ोटक घातपात झाला होता आणि त्यात २२ लोकांचा हकनाक बळी पडला होता. पण म्हणून कोणी त्यातले सत्य बघायला वा बोलायला राजी नव्हता. ही जगभरच्या उदारमतवादाची शोकांतिका होऊन गेलेली आहे. मारल्या जाणार्‍या लोकांच्या रक्ताचे डागही सुकत नाहीत, त्याच्याआधी दहशतवादाला धर्म नसतो, असली पोपटपंची सुरू होत असते. त्याला अमेरिकेपासून जगातला कुठलाही देश अपवाद नाही. पण त्यातले सत्य बोलण्याची हिंमत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केल्यावर त्यांना गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल गेलेली होती. अलिकडे त्याच भूमिकेतून फ़्रान्सच्या निवडणुका झाल्या आणि त्यात मुस्लिम दहशतवादाचा मुद्दा घेऊन लढणार्‍या उमेदवाराने तुल्यबळ लढत दिलेली आहे. पण तितके सत्य बोलण्याची हिंमत इंगिलश राजकारण्यांना अजून झालेली नव्हती. रविवारच्या घटनेनंतर तेरेसा यांनी ती भाषा बोलण्याची हिंमत केलेली आहे. कारण आता सत्यापासून अधिक काळ पळता येणार नाही, याचे त्यांनाही भान आलेले असावे. काय म्हणाल्या या महोदया?

झाले तितके पुरे झाले. या हत्याकांडामागे विकृत इस्लामी हिंसक मनोवृत्ती असून, आपल्याला दहशतवादाच्या संदर्भातील धोरणाचा नव्याने विचार करावाच लागणार आहे. हे विधान त्यांनी निवडणूका चालू असताना बोललेले आहे. म्हणजेच इस्लामी हिंसाचाराने ग्रासलेल्या मतदाराला आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण आता जगभर या दांभिक भाषेला लोक कंटाळलेले आहेत. आपल्याकडे अशा घटना घडल्यावर जखमींच्या वेदनेवर फ़ुंकर घालण्याच्याही आधी असली फ़ुसकी भाषा सुरू होत असते. हिंसा व त्यातले मृत्यूचे तांडव बघायच्या आधी दहशतवादाला धर्म नसतो असली पोपटपंची सुरू होत असते. तिथे रक्तपात करणारे सैतान अल्लाहू अकबर अशा गर्जना करीत अंगावर धावून येतात आणि त्यातून रक्तबंबाळ झालेल्यांच्या जखमांवर कोणती मलमपट्टी लावली जाते? जखमा वा मृत्यू देणार्‍याला धर्म नसतो? समोरचा कोणी धर्माच्या नावानेच तुमच्यावर अकारण हल्ला करीत असतो आणि तुमचे रक्त सांडत असतो. पण तुमच्यावर उपाय करणारे सांगतात? तुला त्यामुळे मृत्यू आलेला नाही. तुला त्यामुळे जखमा झालेल्या नाहीत. या भाषेतला खोटेपणा आता लोकांना सहन होईनासा झाला आहे आणि त्यातूनच टेरेसा मे यांच्या तोंडातून हे उदगार बाहेर पडलेले आहेत. झाले तितके पुरे झाले, याचा अर्थ आजवरचा खोटारडेपणा पुरे झाला. आता सत्य बोलण्याला पर्याय राहिलेला नाही. इस्लामी दहशतवाद हीच समस्या आहे आणि कुठल्याही कारणाने का असेना त्याचा धर्माशीच संबंध आहे. असेच त्यांना स्पष्टपणे सांगावे लागले आहे. म्हणूनच तेवढ्यावर न थांबता त्यांनी आजवरच्या धोरणात काही मूलभूत फ़ेरबदल करावे लागतील, असे मतप्रदर्शन केलेले आहे. ट्रंप जे खुलेआम बोलत आलेले आहेत, तेच शब्द अजून टेरेसा बाईंनी अतिशय सावधपणे बोलून दाखवले आहेत.

उदारमतवाद नावाच्या दांभिकपणाने गेल्या दोनचार दशकात जगातल्या अधिक निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. कारण दिसायला कोणी जिहादी वा अतिरेकी हिंसा करताना दिसतो. पण त्याच्यातही हिंमत व साहस जोपासण्याचे काम उदारमतवादी दांभिकपणानेच केलेले आहे. त्याचे परदेशातील नमूने वेगळे असतील. आपल्याकडले नमूने वेगळे आहेत. काश्मिरात सैनिकांवर जमाव एकत्र जमून दगडफ़ेक करतो, तर त्यांच्यातही हिंसक वृत्ती नाकारून त्यांच्यातल्या नाराजीचे कोडकौतुक चालते. तेव्हा त्यांच्या हिंसेला समर्थन मिळत असते. मग ज्यांच्या हिंसक वृत्तीसमोर सैनिक दुबळा झालेला दिसतो, त्यांच्या गुंडगिरी समोर सामान्य नागरिक कितीसा ठामपणे उभा राहू शकेल? पर्यायाने कायदा व सरकारपेक्षाही अशा दहशतीची हुकूमत प्रस्थापित होत असते. अशा लोकांच्या इशार्‍याला सामान्य माणूस घाबरू लागतो. कायदाही त्याचा बाल बाका करू शकत नाही. तेव्हा त्याच्यातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक लोक गुन्हेगारी व दहशतवादाकडे आकर्षित होत असतात. वेळीच अशा लोकांची नांगी कायदा व अंमलदारांनी ठे़चली, तर तशा गोष्टीतला धोका ओळखून अनेकजण त्यापासून दुर रहातील. पण उदारमतवादी भंपकपणाने अशा वृत्तीला खतपाणी घालून शिरजोर करून ठेवले आहे. त्यातून इंग्लंड वा कुठल्याही लोकशाही देशातली इस्लामिक हिंसाचारी सैतानी प्रवृत्ती अधिक शिरजोर होत गेली आहे. सरकारी वा राजकीय धोरणच त्याला जबाबदार आहे आणि त्याचा त्याग करावा लागेल, असाच इशारा टेरेसा यांनी या विधानातून दिला आहे. मागल्या कित्येक वर्षाच्या बधिरीकरणाने नेते व राजकीय पक्षांच्या जाणिवा इतक्या निकामी होऊन गेल्या आहेत, की त्यांना सत्य बघण्या्चा वा त्यानुसार प्रतिक्रीया देण्याचाही विवेक राहिलेला नाही. पण आता टेरेसा यांना त्या बधिरीकरणातून जाग आलेली असावी. म्हणूनच त्यांनी इशारा दिला आहे.

अर्थात एखादी घटना घडल्यावर अशी तीव्र प्रतिक्रीया उमटत असते. पण म्हणून युरोप वा इंग्लंडच्या धोरणात विनाविलंब बदल होईल, अशी अपेक्षा कोणी करू नये. असे बदल हळुहळू होत असतात. चारपाच दशकात जो दांभिकपणा राजकारणाने अंगी बाणवला आहे, त्यात इतक्या लौकर सुधारणा होण्याची बिलकुल शक्यता नाही. तो बदल अतिशय हिंसक मार्गानेच घडून येऊ शकेल. याचा अर्थ सामान्य लोकच कायदा हाती घेऊ लागतील आणि असे कोणी संशयित जिहादी दिसतील वा नुसताच संशय आला, म्हणूनही त्यांचे रस्तोरस्ती मुडदे पाडू लागतील, तेव्हाच राजकारण्यांना जाग येऊ शकेल. कारण ज्या सरकारने लोकांना सुर्क्षा बहाल करायची असते, तेच निकामी ठरले, मग स्वसंरक्षणार्थ लोकांनाच आपले संरक्षण करण्यासाठी काही करावे लागेल. ते कृत्य समजावण्याचे वा अहिंसक असू शकत नाही. ज्याच्या हातात प्राणघातक हत्यार वा अवजार आहे, त्याच्याशी संवाद होऊ शकत नसतो. त्याला आधी मारणे वा त्याच्याकडून हकनाक मारले जाणे, इतकाच पर्याय उपलब्ध असतो. मग आपण जगायचे तर आधी समोरच्याला मारणे अशी पाशवी प्रवृत्ती सामान्य नागरिकातही बळावत जाते. त्याचे पडसाद अन्यत्र उमटू लागतात. ज्याला अराजक मानले जाते. ते अराजक आवरण्यासाठी सरकारलाही आपला उदारमतवाद सोडून अपवादात्मक स्थिती हाताळण्यासाठी हिंसक उपाय योजावे लागतात. त्यामध्ये ज्यांना मरणाची ओढ लागलेली असेल, त्यांना टिपून ठार मारावे लागते आणि त्यातूनच उर्वरीत लोकसंख्येचा कायद्यावरून उडालेला विश्वास नव्याने मिळवावा लागत असतो, टेरेसा मे यांच्या उपरोक्त विधानाने त्याच दिशेने पहिले पाऊल टाकले गेले असे म्हणता येईल. त्याचे प्रतिध्वनी अन्य देशात उमटू लागतील, तेव्हा जगभरात इस्लाम विरोधी मोठी प्रतिक्रीया उमटू लागेल आणि त्यात अशा धर्मांधतेने पिडलेल्या अनेक मुस्लिमांनाही आपल्याच धर्माच्या हिंसेविरोधात उभे रहायची पाळी येणार आहे. आज जशा हजारोच्या संख्येने भारतातील मुस्लिम तलाकपिडित महिला पुढे येऊ लागल्या आहेत.

No comments:

Post a Comment