Wednesday, June 14, 2017

कॉग्रेसची वैचारीक सिक्युरिटी

rahul yechury के लिए चित्र परिणाम

गेल्या काही दिवसात वाहिन्यांवरील चर्चांमध्ये एक मजेशीर गोष्ट अनुभवास येत आहे. अनेक वाहिन्यांवर कॉग्रेस पक्षाचा कोणी प्रवक्ता हजेरी लावत नाही. मात्र पक्षात चाललेल्या भ्रष्टाचार वा गुन्ह्यासाठी कॉग्रेसचा बचाव मार्क्सवादी प्रवक्ते करीत असतात. समाजवादी किंवा जनतादल या पक्षाचे प्रवक्ते राहुल गांधींचा बचाव मांडायला पुढाकार घेताना दिसत आहेत. उदाहरणार्थ युपीए सत्तेत आली, तेव्हा २००४ सालात आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये एनरॉन विरुद्ध भारत सरकारचा खटला चालू होता, त्यामध्ये भारताची बाजू हरीष साळवे नावाचे ज्येष्ठ वकील मांडत होते. त्यांनी अतिशय समर्थपणे भारताची बाजू तिथे मांडलेली असतानाही त्यांच्याकडून वकीलपत्र काढून घेण्यात आले. आधीच्या वाजपेयी सरकारने त्यांची नेमणूक केली होती आणि सरकार बदलले म्हणून अशी नेमणूकही बदलावी काय? पण तसा निर्णय घेण्यात आला आणि अधिक मोबदला मोजून पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश वकील खावर कुरेशी यांच्याकडे भारताचे वकीलपत्र सोपवण्यात आले. अर्थात त्यांनी त्यात भारताला पराभूत करून दाखवले आणि साळवे यांनी जिंकत आणलेला खटला गमावून दाखवला. की तो खटला गमावून देशाचे मोठे नुकसान करण्यासाठीच युपीएने साळवे यांना हटवले होते? कारण साळवे बाजू मांडत असेपर्यंत भारताची बाजू भक्कम होती. मग अधिक किंमत मोजून खावर कुरेशी यांना आणण्याची गरज काय होती? कॉग्रेसचा कोणीही प्रवक्ता त्याचे उत्तर देऊ शकत नव्हता. म्हणूनच त्या पक्षाने वाहिनीच्या चर्चेकडे पाठ फ़िरवली होती. पण मार्क्सवादी सुनील चोप्रा यांनी मोठ्या हिरीरीने कुरेशी यांच्या नेमणूकीचे समर्थन करून दाखवले. हा फ़क्त एकच विषय नाही. मागल्या अनेक दिवसात कॉग्रेसला कुठल्याही वाहिनीवर आपला पक्ष प्रवक्ता पाठवण्याची गरज राहिलेली नाही. मार्क्सवादी विचारवंत ती कामगिरी फ़ुकटात करीत आहेत.

संदीप दिक्षीत नावाचे कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत. त्यांनी आपल्या एका बेताल विधानामध्ये भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सडकछाप गुंडा संबोधण्यापर्यंत मजल मारली. त्यावरून मोठे काहूर माजले. वाहिन्यांवर गदारोळ झाला आणि कॉग्रेसच्या अन्य प्रवक्त्यांनीही दिक्षीत यांचे समर्थन करण्यास नकार दिला. दिल्लीत व अन्यत्र दिक्षीत यांच्या निषधार्थ अनेक लोक रस्त्यावर आले, तर दोन दिवसांनी राहुल गांधी यांनी बंगलोरच्या एका समारंभात दिक्षीत यांचे काम उपटले. लष्करप्रमुख व्यक्तीविषयी असे बोलणे अयोग्य असल्याचे राहुलनी मान्य केले. पण मार्क्सवादी नेते सुनील चोप्रा किंवा अन्य काही लोकांनी दिक्षीत यांची बाजू हिरीरीने मांडली. तेच एकटे नाहीत. नितीशकुमार यांच्या जदयु किंवा अखिलेशच्या समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनीही संदीप दिक्षीत यांच्या भाषेचे स्वागतच केले. थोडक्यात आता क्रमाक्रमाने देशात कॉग्रेस आणि अन्य सेक्युलर पक्षांमधली दरी कमी होत चालली आहे. बाकीचे पुरोगामी पक्ष हळुहळू कॉग्रेसच्या उपशाखा होऊ लागल्या आहेत. त्यांच्यापाशी संघर्ष करण्याची क्षमता संपलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी मैदानातले राजकारण सोडून कॉग्रेसच्या वैचारिक सिक्युरिटी गार्डचे काम पत्करलेले असावे. अन्यथा राहुल किंवा कॉग्रेसच्या कुणा नेत्याने केलेल्या मुर्खपणाची जबाबदारी मार्क्सवादी नेत्यांनी घेण्याचे कारणच काय? पण तसे चालू झाले आहे. महाराष्ट्रात या़ची सुरूवात अठरा वर्षापुर्वी झाली आणि आता ते तमाम सेक्युलर पक्ष नामशेष होऊन गेलेले आहेत. १९९९ सालात शरद पवार यांनी सेना-भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी पुरोगामी ऐक्याची संकल्पना पुढे आणली आणि त्यात सत्ता कॉग्रेसच्या दोन्ही गटांनी बळकावताना बिचारे शेकाप, जनतादल वा कम्युनिस्ट असे तमाम सेक्युलर पक्ष सती गेले. आज त्यांचे नामोनिशाण उरलेले नाही. आता त्याची देशव्यापि पुनरावृत्ती होऊ घातली आहे.

१९९९ सालात पवारांनी महाराष्ट्रात जो पुरोगामी प्रयोग केला, त्याचा देशव्यापी विस्तार २००४ सालात सोनिया गांधींनी केला. महाराष्ट्रात १९९९ नंतर पाच वर्षांनी त्याच पुरोगामी पक्षांना वार्‍यावर सोडून कॉग्रेस राष्ट्रवादींनी स्वबळावर पुन्हा सत्ता मिळवली. मात्र या गडबडीत पुरोगामी पक्षांची शक्ती पुर्णपणे क्षीण होऊन गेली. जनता दल वा कम्युनिष्ट जवळपास नामशेष झाले तर शेकापला चारपाच आमदारही निवडून आणण्याची क्षमता राहिली नाही. मात्र ज्या शिवसेना व भाजपाला सत्तेपासून रोखायला हा पुरोगामी प्रयोग करण्यात आला होता, ते संपले नाहीत. उलट पंधरा वर्षांनी तेच दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढूनही कॉग्रेस राष्ट्रवादीची सत्ता हिसकावून घेऊ शकले. मात्र दरम्यान पुरोगामी महाराष्ट्रात आता कुठल्या पुरोगामी पक्षाला स्थान राहिलेले नाही. कॉग्रेस व राष्ट्रवादीच आता स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेऊ लागले आहेत. त्यांच्या दारात तथाकथित पुरोगाम्यांना आश्रिताचे जगावे लागते आहे. नेमका तोच घटनाक्रम २००४ नंतरच्या कालखंडात देशभर घडून आलेला बघायला मिळतो. आधी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी अन्य पुरोगामी पक्षांच्या मदतीला डाव्या आघाडीने पाठींबा दिला आणि चार वर्षात कॉग्रेसने त्यांना असा धोबीपछाड दिला, की डाव्यांचा बंगालचाही बालेकिल्ला ढासळू लागला. आधी ममतासोबत जाऊन कॉग्रेसने २०११ सालात डाव्यांचा किल्ला ढासळून टाकला आणि २०१६ सालात डावी आघाडी कॉग्रेसच्या सोबत ममताला संपवण्यासाठी आली असताना, कॉग्रेसला जीवदान देऊन डावी आघाडी सती झाली. तीन दशके बंगालमध्ये अजिंक्य असलेल्या डाव्या आघाडीला आज बंगालमध्ये स्थान उरलेले नाही आणि तिथेही ममतांशी भाजपा झुंज देताना दिसतो आहे. पण पुरोगामीत्वाच्या व्रताची नशा उतरलेली नाही आणि आता मार्क्सवादी विचारवंत राहुल गांधींच्या बालीशपणाचेही वैचारीक समर्थन करायला पुढे झाले आहेत.

द्वेष वा हेवा कुठल्या रसातळाला घेऊन जातो, त्याचे प्रतिक म्हणून आजच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे बघता येईल. त्यांना भाजपा किंवा संघाच्या द्वेषाने इतके भारावून टाकले आहे, की त्यांना आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवणे किंवा आपली शक्ती वाढवणे याची अजिबात फ़िकीर राहिलेली नाही. भाजपाचे वा मोदींचे नाक कापण्याच्या नशेने त्यांना झिंगून टाकलेले आहे. सहाजिकच कुठलीही गोष्ट वा विषय भाजपाच्या विरोधात भरकटून टाकण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालण्याला असे लोक आपला वैचारीक विजय मानु लागले आहेत. असे प्राध्यापक वा बुद्धीमंत राहुलच्या पोरकटपणाचे समर्थन करण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालणार असतील, तर राहुलसह अन्य कॉग्रेस नेत्यांनी आपल्या निर्बुद्ध मुक्ताफ़ळांनी बेताल बडबड कशाला करू नये? दाऊद वा छोटा राजन आपल्या वकीलांना विचारून गुन्हे करत नसतात. तर कुठलाही गुन्हा बेधडक करायचा. मग कोर्टात जायची वेळ आल्यावर त्यांच्या वकीलाने त्यात गुन्हा नसल्याचे सिद्ध करण्यासाठी आपली अक्कल पणाला लावावी, असाच व्यवहार असतो ना? नेमकी तशी काहीशी भूमिका आजकाल डाव्या पुरोगामी विचारवंतांनी पत्करलेली आहे. पोरकट युक्तीवादातून आपला मुर्खपणा उघड होतो याचेही भान अशा डाव्या विचारवंतांना वा मार्क्सवादी शहाण्यांना उरलेले नाही. त्यातून आपण बुडालेली आपली डाव्या पुरोगामी राजकारणाची नाव बाहेर काढण्यात यशस्वी होऊ, अशी त्यांची खुळी आशा आहे. पण व्यवहारात ते आपल्याच विचारांना तिलांजली देत चालले आहेत. त्यांच्या पुर्वजांनी मोठ्या कष्टाने पुरोगामी विचारांना जनमानसात मिळवून दिलेले स्थान नामशेष करीत आहेत. पण त्यांना सांगणार कोण आणि समजावणार कोण? शहाण्यांना कोणी समजावू शकत नसतो. कारण त्यांना सर्वकाही समजलेलेच असते ना? शिकायचे काही शिल्लकच उरलेले नसते ना?

2 comments:

  1. महाराष्ट्त पण हेच चालूय मोदी विरोधासाठी इथले पुरोगामी काॅंगरेस काय पाकच्या पण बाजुने जाताना दिसतात आणि त्याठी एवढी बुदधि खर्च करतात की आपण काय करतोय त्याचे पन भान राहत नाही.परवा रिपब्लिक वर सुनिल चोप्रा दिक्षितची बाजु घेताना जरा नवलच वाटल ते पुर्ण प्रवक्तयासारखे बोलुवतर शकत नव्हते तत्यामुळ अरनब राहुल संदिपला अक्षरशः चोपुन काढत हेता

    ReplyDelete
  2. कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्व एकमेकांना पूरक आहे.... राजकीय सत्ता कॉंग्रेस कडे आणि पॉलिसी मेकिंग डाव्या लोकांकडे अशी वाटणी आहे त्यामुळे कॉंग्रेस च्या वतीने भांडत आहेत

    ReplyDelete