Wednesday, July 5, 2017

मनी वसे ते स्वप्नी दिसे

Image result for modi in israel

अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलला तीन दिवसांची भेट देण्याचा निर्णय घेतला. या दोन भेटींनी काय साध्य झाले, त्याचा हिशोब इतक्यात मांडता येणार नाही. कारण दोन देशात विविध करार होतात आणि विविध विषयांची देवाणघेवाण होत असते. हे विषय दिर्घकालीन असल्याने त्याविषयी तात्काळ मतप्रदर्शन करण्यात अर्थ नसतो. पण अशा भेटी व दौर्‍याच्या काय शक्यता असतात, त्याची प्रचिती शत्रूंकडून येत असते. या दोन भेटीगाठींनी भारताचे दोन शेजारी कमालीचे विचलीत झालेले आहेत. पाकिस्तान व चीन यांची झोप उडालेली आहे. आजवर चीन केवळ पाकिस्तानला पुढे करून भारताची कुरापत काढण्यात धन्यता मानत होता. पण डोनाल्ड ट्रंप यांनी अगत्याने मोदींना आमंत्रण दिले आणि पाहुणचार दिल्यापासून चीनला घरातलेही अन्न गोड लागेनासे झाले आहे. अन्यथा अझहर मसूदला दहशतवादी ठरवण्याचा विषय असो किंवा भारताला अणु पुरवठेदार गटामध्ये स्थान देण्याचा विषय असो, त्यात खोडा घालण्यापलिकडे चीनची मजल गेलेली नव्हती. आता मात्र चीन स्वत: सिक्कीम वा भूतानच्या सीमेवर कुरापत काढू लागला आहे. पाकिस्तानच्या तमाम माध्यमांनी मोदींच्या इस्त्रायल दौर्‍यावर सतत आक्रोश चालविला आहे. भारत अन्य कुठल्या देशाशी दोस्ती करीत असेल, तर पाकिस्तानने इतके विव्हळण्याचे कारणच काय? प्रामुख्याने इस्त्रायलशी पाकिस्तानचा काय संबंध? भारताने त्या देशाशी दोस्ती केली, तर पाकला इतकी पोटदुखी कशाला? ज्या अरबी देशांच्या खिरापतीवर पाकिस्तान गुजराण करतो, त्यापैकी अनेकांनी आधीच इस्त्रायलशी दोस्ती केली आहे. तेव्हा पाकला इतक्या ओकार्‍या झालेल्या नव्हत्या. मग भारताच्या इस्त्रायल मैत्रीचे पाकला वावडे कशाला? हे वावडे व पोटदुखी्च यातली खरी रणनिती स्पष्ट करून जाणारी आहे.

काहीतरी मोठे होऊ घातले आहे आणि त्याची तयारी म्हणून भारत, अमेरिका व इस्त्रायल एकत्र येत असल्याची चाहुल या बदमाशांना लागलेली असावी. अन्यथा त्यांनी नेमका हाच मुहूर्त साधून भारताला हुलकावण्या दाखवण्याचे काही कारण नव्हते. त्यापैकी चीनला भिती अमेरिकेची आहे, तर पाकला आपलीच दहशतवादी भुतावळ भयभीत करते आहे. मागल्या दोन दशकात पाकने काश्मिरच्या बाबतीत जी भुतावळ उभी करून भारताला हैराण केलेले आहे, त्याच अनुभवातून इस्त्रायल पुर्वी गेलेला आहे. त्याने हमास व अन्य जिहादींचा कठोर बंदोबस्त करून दाखवलेला आहे. आपण बारकाईने दोन दशकातले पॅलेस्टाईन व गाझा पट्टीतील निदर्शने व हिंसेचे फ़ोटो  अभ्यासले तर त्यात आजच्या काश्मिरी आझादीचे प्रतिबिंब दिसू शकेल. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी राष्ट्रसंघाच्या मंचावरूनच अशा काश्मिरी हिंसाचाराला ‘इंतेफ़ादा’ असे विशेषण जोडलेले आहे. गाझा व पॅलेस्टाईनच्या जिहादी आंदोलनाला तेच नाव आहे. आधी यासर आराफ़त यांनी त्याचा साक्षात्कार घडवला होता आणि इस्त्रायलला सतत हिंसात्मक घातपातांनी हैराण करून सोडलेले होते. देशात व देशाबाहेर इस्त्रायली नागरिकांची हत्याकांडे घडवून आणणे, त्यासाठी घातपाताची कारस्थाने करणे आणि विमान अपहरणापर्यंत प्रकार घडलेले होते. त्या सर्वांना इस्त्रायल पुरून उरला, तेव्हा आराफ़तही थकले आणि त्यांनी तडजोडीने अरबी प्रदेशाला स्वायत्तता मिळण्यावर समाधान मानले. इस्त्रायलने त्यांना हिंसात्मक मार्ग सोडण्याच्या बदल्यात तशी सुविधा दिली. पण मग त्या जिहादने नवे नाव नवे रूप धारण करून धुमाकुळ चालू ठेवला. त्याला हमास म्हणून ओळखले गेले होते. पण अशा हिंसेचा बंदोबस्त करण्याची नवी रणनिती व तंत्रज्ञान इस्त्रायलने तयार केले आणि यशस्वी करून दाखवले. मोदी त्यासाठीच तिकडे अगत्याने गेलेले आहेत काय?

जगात कुठेही व आपल्या भूमीत जिहादला पुरता नामोहरम करून टाकण्यात यशस्वी झालेला देश, म्हणून इस्त्रायलची जगाला ओळख आहे. किंबहूना जिहादी तंत्र वापरून सत्तेला व सरकारी यंत्रणेला हैराण करण्याचा जगातला पहिला प्रयोग इस्त्रायलमध्येच झालेला होता. त्यातूनच त्यांनी अशा प्रवृत्तीशी लढायची विविध तंत्रे विकसित केलेली आहेत. पुढल्या काळात पाकिस्तानने काश्मिरच्या बाबतीत त्या जिहादी तंत्राचा वापर केलेला आहे. घातपात व हत्याकांडापासून सैनिकांवर दगडफ़ेक करण्यापर्यंत काश्मिरात हमासचेच अनुकरण झालेले आहे. त्याला आवर घालण्यात व बंदोबस्त करण्यात भारतीय सेना तोकडी पडत आहे. कारण हा भारतीय सेनेसाठी नवा अनुभव आहे आणि इस्त्रायलसाठी आता हे अंगवळणी पडलेले काम आहे. हमास वा त्यांच्या जिहादींना शेजारी देशांकडून मिळणारी मदत कशी रोखावी आणि त्यांची चहुकडून कोंडी कशी करावी; याचे तंत्र इस्त्रायली सेनेने आत्मसात केलेले आहे. त्यांच्याशी भारताने हातमिळवणी केल्यास पाकचे काश्मिरातील उद्योग निकाला निघू शकतात. ते करताना पाकसेना आक्रमक पवित्राही घेऊ शकते. तर आतले घातपाती हाताळतानाच सीमेपलिकडले त्यांचे बोलविते धनी कसे निकालात काढावे तेही इस्त्रायल शिकलेला आहे. अशा उचापतींना प्रोत्साहन व मदत करणार्‍यांना इस्त्रायलने युद्ध पुकारून नामोहरम केलेले आहे. किमान साधनांनी कमाल यश मिळवणे, ही इस्त्रायली रणनिती आज भारताला सुरक्षेची हमी देऊ शकते. तसे झाले तर पाकसेना पुरती लुळीपांगळी होऊन जाईल. तिला आपली कातडी बचावण्यासाठी तोयबा किंवा मुजाहिदीन यांची कास सोडावी लागेल. इथे भारतीय प्रदेशात बसून पाकिस्तानसाठी उचापती करणार्‍या हुर्रीयतवाल्यांचाही बंदोबस्त त्यात समाविष्ट असेल. इस्त्रायल म्हणजे नुसतील शस्त्रसामग्री नाही. जगाला भेडसावणार्‍या जिहादचे पेकाट मोडून दाखवणारी पहिली प्रभावशाली प्रयोगशाळा आहे.

सहाजिकच ज्यांना कोणाला जिहादची खुमखुमी असते आणि सैनिकी मस्तवालपणाची बाधा झालेली असते, त्यांना इस्त्रायल हे नाव भयभीत करीत असेल तर नवल नाही. परिणामी मोदींचे इस्त्रायलमध्ये जंगी राजेशाही स्वागत झाले, तर पाकिस्तानची झोप उडण्याला पर्याय नव्हता. जो इस्त्रायल इतक्या अगत्याने मोदींचे स्वागत करतो, तो केवळ व्यापारी संबंध वा राजकीय हेतूने असे करणार नाही. त्याला कुठल्यातरी व्यापक कारणासाठी भारताची मदत हवी असणार, हे पाकिस्तानला पक्के ठाऊक आहे. इस्त्रायलला पाकिस्तानशी कर्तव्य नसून त्याच्या अणुबॉम्बशी कर्तव्य आहे. कुठलाही इस्लामिक बॉम्ब हा आपल्या अस्तित्वाला धोका आहे, ही इस्त्रायलची जुनी भूमिका आहे. म्हणून तर १९८० च्या दशकात त्याने इराकच्या भूमीत घुसून हवाई हल्ला केला आणि सद्दामने उभारलेल्या अणुभट्टीचा विध्वंस घडवून आणलेला होता. अशा इस्त्रायलला पाकिस्तान अणुसंपन्न असण्यात कायम धोका वाटत राहिला तर नवल नाही. त्यामुळेच पाकचा अणुबॉम्ब हा जितका भारताला धोका असतो, तितकाच इस्त्रायललाही धोका असतो. असे दोन देश राजरोस गळ्यात गळे घालू लागले, तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धोका आहे, हे पाकला समजू शकते. त्यापेक्षाही इस्त्रायल भारताच्या मदतीने आपले अण्वस्त्र कोठार उध्वस्त करण्याची भिती पाकला भेडसावू लागली असेल, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. म्हणूनच चीनसह पाकला या नव्या मोदी दौर्‍यांनी भयभीत करून टाकले आहे. चोराच्या मनात चांदणे म्हणतात, तशी त्यांची तारांबळ उडालेली आहे. वास्तवात नेतान्याहू व मोदी काय बोलतील व ठरवतील, तो विषय वेगळा आहे. पण या दोन चोरांना आपल्याच मनातली भुते भेडसावू लागलेली आहेत. पाकिस्तानला तर आपल्याच घरातले अण्वस्त्रांचे फ़टाके पेटले तर, म्हणून झोप लागेनाशी झालेली दिसते आहे.

9 comments:

  1. Sundar Parikshan.. Sir

    ReplyDelete
  2. असे झाले तर ते एक आश्चर्यच म्हणावे लागेल. गांधी वादाने भारतीय मानसिकता षन्ढ झाली आहे.

    ReplyDelete
  3. मस्त विश्लेपण

    ReplyDelete
  4. Modijina khare mitra ani mitratwacha burakha ghetalele hyancyatala farak changlach kalato

    ReplyDelete
  5. Pakistan che nav badala aani PAPiStan theva, China aani India ekatra vilinikarsn akhand Asia kara. Simawad sampel aani regional haq abhadit rahtil.

    ReplyDelete
  6. Apratim Analysis !! A lot to think n study abt !! Great.

    ReplyDelete
  7. अभिषेक मुळेJuly 8, 2017 at 11:25 PM

    भाऊ नेहमीप्रमाणे नेमके विश्लेषण तुमच्या लेखणी ला मुजरा

    ReplyDelete
  8. Very true analysis....but if this happens then that will be treat as 2nd Independence for our India

    ReplyDelete
  9. आदरणीय भाऊ,
    हाती लेखणी आली की आपणास सर्व विषयातील सर्व काही कळते असा मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांचा समज झाला आहे. (पुलंच्या 'सखाराम गटणे' मध्ये - 'आयझेनहॉवरपासून नाना पाटलांपर्यंत तो कुणालाही सावध करू लागला' या वाक्याप्रमाणे)मा. मोदीजींच्या इस्राएल दौऱ्याबाबत तमाम संपादकांनी या दौऱ्याबाबत हुरळून जाण्याचे काही कारण नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमी वैयक्तिक संबंधांच्या पलीकडे पहावे लागते, ई. शहाणपणाचे सल्ले दिले आहेतच. मा. मोदीजींविषयी कायम नकारात्मक दृष्टीकोनातून लिखाण करणाऱ्या एका अतीशहाण्या संपादकाने तर इस्राएल मित्रांना मदत करतोच पण मित्रांच्या शत्रूंनाही मदत करतो असे तारे तोडले आहेत (वास्तविक पहाता ६२ व ७१ च्या तसेच कारगिल युध्दातही इस्राएलने फक्त आपल्याला व आपल्यालाच मदत केली आहे.)काही संपादकांनी इस्राएलचे तंत्रज्ञान आपणास उपयोगी पडेल असा थोडा समंजस सूर लावला आहे. पण या सर्व दृश्य गोष्टींपलीकडे जाऊन ज्याला इंग्रजीत 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' म्हणतात त्याप्रमाणे या ऐतिहासिक घटनेतील नेमका मतितार्थ फक्त आपणच काढला आहे. अतिशय सुंदर विश्लेषण. धन्यवाद .

    ReplyDelete