Saturday, August 12, 2017

वंदे मातरमची सक्ती कशाला?



युक्तीवाद ही मुळातच फ़सवेगिरी असते. डोळ्यासमोर दिसते किंवा कानाला ऐकू येते अशी कुठलीही गोष्ट पटवून द्यावी लागत नाही. जेव्हा तशी वेळ येते, तेव्हा समजावे की युक्तीवाद सुरू झालेला आहे. वंदे मातरम कशाला म्हणायला हवे? हा तसाच एक युक्तीवाद आहे. प्रत्येक वेळी मुस्लिमांनी आपल्या राष्ट्रप्रेमाची साक्ष कशाला दिली पाहिजे? अशीही भाषा सातत्याने ऐकू येत असते. ही भाषा बोलणारे आपली बुद्धी पणाला लावून युक्तीवाद करत असतात. इतक्या कौशल्याने बाजू मांडली गेली, मग कोणालाही त्यात तथ्य असल्याचे वाटू लागले तर नवल नाही. कुठल्याही तात्कालीन सिनेमाची गाणी इतकी वाजत असतात, की नकळत ती आपल्यालाही कधी पाठ होऊन गेली, तेही आपल्या लक्षात येत नाही. हे युक्तीवाद तसेच असतात. पण असाच दुसर्‍या बाजूचा युक्तीवाद समोर आला, मग असले युक्तीवाद करणार्‍यांची भंबेरी उडत असते. प्रत्येक वेळी वा प्रत्येक जागी मुस्लिमांनी आपल्या राष्ट्रप्रेमाची ग्वाही देण्याची काहीही गरज नाही. कोणी वंदे मातरम म्हटल्याने राष्ट्रप्रेमाची ग्वाही मिळत नसते, किंवा त्याच्या राष्ट्रनिष्ठेची हमी मिळत नसते. पण तोच नियम मग इतरही बाबतीत लागू होतो. कोणी सतत संविधानाचे हवाले देत असला, किंवा संविधानाची भाषा बोलत असला, म्हणून तो घटनेचा सन्मानच करतो असेही मानायचे कारण नाही. कोणी गांधी नेहरूंच्या नावाची जपमाळ ओढत असला, म्हणून तो त्यांचे विचार व आचार यांचा अवलंब करतो असेही होत नाही. मग त्या बाबतीत तरी कशाला आग्रह धरला जात असतो? संघाचा कोणी स्वयंसेवक वा हिंदूत्ववादी असेल, तर त्यानेही पुरोगामी असल्याची तरी साक्ष देण्याची काय गरज असते? भारतातला प्रत्येक राजकीय पक्ष आपली नोंदणी करून घेतो, तेव्हा तो सेक्युलर असल्याचे मान्य करतो. मग भाजपा किंवा तत्सम पक्षांकडे पुरोगामी असण्याची ग्वाही कोण कशाला मागत असतात?

उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने मुस्लिम धर्माचे शिक्षण देणार्‍या शाळा म्हणजे मदरश्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची सक्ती करणारा आदेश जारी केला आहे. त्यावरून काहुर माजलेले आहे. या मदरश्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा करावा, त्यानिमीत्त सांस्कृतिक कार्यक्रम साजरे योजावेत आणि त्याचे व्हीडीओ चित्रणही करून घ्यावे, असा हा आदेश आहे. सहाजिकच ही मुस्लिमांवरची सक्ती असल्याचा आरोप झालेला आहे. वरकरणी तो आरोप खराही वाटू शकतो. पण अशी सक्ती करायची वेळ कशाला आली, त्याकडे कोणी बघायचे? विमानतळावर कोणीही प्रवासी आपल्या सामानासह जातो, तेव्हा त्याची कसून तपासणी केली जाते. त्याची तरी काय गरज आहे? तसे प्रत्येक प्रवा़श्याला जगभर वागवले जाते. तेव्हा त्याच्याकडे कोणतेही दृष्य कारण नसताना त्याला घातपाती वा गुन्हेगार मानूनच तपासणी होत असते ना? मग त्याच्यावरही अशी सक्ती कशाला होते? कोणीतरी प्रवासी म्हणून घातपात केलेला असतो, म्हणून ही दक्षता घ्यावी लागत असते. त्यातून प्रत्येक निरपराध प्रवासी व्यक्तीला आपण घातपाती नाही, असे सिद्ध करण्याची सक्तीच झालेली नाही काय? जगातले सर्व असे प्रसंग शोधून काढले, तर त्यात ८०-९० टक्के मुस्लिम प्रवासी तशा घातपातात गुंतलेले दिसतील. पण तरीही भेदभाव नको म्हणून प्रत्येक विमान प्रवाश्याला ही सक्ती सहन करावी लागते आहे. आपण गुन्हेगार नसल्याची ग्वाही तपासाशी सहकार्य करून प्रत्येक प्रवाश्याला दयावी लागते आहे. त्याचे कारण मूठभर मुस्लिम घातपाती आहेत. अशा कारणाने जगातल्या किती मुस्लिम नेते वा म्होरक्यांनी आपल्या धर्मामुळे जगावर असे संकट आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे? कारण असे घातपात करणार्‍या प्रत्येक मुस्लिमाने धर्माच्याच नावाखाली हिंसाचार केलेला आहे. त्यासाठी अन्य धर्मियांनाही सक्तीने आपले निर्दोष असणे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे.

गळ्यावर सुरी ठेवली तरी वंदे मतरम म्हणणार नाही, अशी टोकाची भाषा जेव्हा असाउद्दीन ओवायसी करतात, तेव्हा प्रत्येक मुस्लिमाच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका निर्माण करत असतात. त्यांचा प्रतिवाद करायला मुस्लिम नेते व धर्ममार्तंड पुढे आले, तरी अशा संशयाचे निराकरण होऊ शकते. मग अशा कुठल्या सक्तीची वेळच येउ शकत नाही. पण जेव्हा तसे प्रसंग येतात, तेव्हा तथाकथित पुरोगामी व मुस्लिम धर्ममार्तंड ओवायसीच्या समर्थनाला उभे रहातात आणि शंकेचा पसारा वाढत जातो. अशा प्रत्येक कृतीतून मुस्लिम नेते व धर्ममार्तंड आपल्या राष्ट्रनिष्ठा शंकास्पद करत असतात. शेवटी राष्ट्र म्हणजे एक भूमी वा प्रदेश नसतो. त्याच्याविषयी निर्विवाद आस्था व निष्ठाच राष्ट्राचा पाया घालत असतात. त्या राष्ट्राविषयी आत्मियता म्हणजेच आपल्या धर्मात बाधा असल्याची भूमिका, राष्ट्राला दुय्यम ठरवत असते. मग धर्म आणि राष्ट्र यांच्यातला बेबनाव सुरू होत असतो. पुरोगामी जो युक्तीवाद करतात, तो म्हणूनच फ़सवा आहे. किंबहूना धर्माचे स्वातंत्र्य व अधिकार ज्या राज्यघटनेने दिलेला आहे, तोच अधिकार घेऊन त्याच राज्यघटनेला पायदळी तुडवण्य़ाचा अधिकार वापरण्याची मानसिकता यात सामावलेली आहे. म्हणूनच तोंडदेखले का होईना, राष्र्ट्रप्रेमाचे प्रमाणपत्र मागावे लागते. जगातल्या कुठल्याही अन्य देशात गेलात तरी तुमच्याकडे मायभूमीची ओळख सांगणारा पासपोर्ट कशाला मागितला जातो? तेव्हा आपण मुस्लिम असल्याने कुठलेही राष्ट्र वा मातॄभूमी आपल्याला नाही, असा दावा चालत नाही. मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन म्हंणून कोणाला पासपोर्ट मिळू शकत नाही. तेव्हा राष्ट्र हीच ओळख असते. त्यापुढे धर्म दुय्यम असतो. मग त्याच राष्ट्राचे गुणगान करण्याची वेळ आल्यावर धर्माचे लचांड पुढे आणायचे कारण काय असते? तीच फ़सवेगिरी असते. सोयीनुसार राष्ट्र आणि गरज संपली मग धर्म, हा दुटप्पीपणा आहे.

यातली पुरोगामी फ़सवेगिरीही लक्षात घेतली पाहिजे. कलपरवा नव्या राष्ट्रपतींच शपथविधी झाला. त्यावेळी भाषण करताना रामनाथ कोविंद यांनी कुठेही पंडीत नेहरूंचा उल्लेख केला नाही. आणखी कुठल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू वा इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला नाही, म्हणून नाके मुरडणारे कोण असतात? हेच पुरोगामी वा सेक्युलर शहाणे दिसतील. त्यांना मोदींच्या तोंडून वा कुणा संघ स्वयेंसेवकाच्या शब्दात नेहरू वा इंदिराजींचे गुणगान ऐकायचा इतका हव्यास कशाला आहे? मोदी वा संघवाल्यांनी नेहरूंचे नाव घेतले नाही, म्हणून पंडीत नेहरूंचे नामोनिशाण पुसले जात असते काय? नेहरूंचे कर्तृत्व कोणी सांगितले नाही वा त्याचा उल्लेख केला नाही, म्हणून नेहरूंच्या कर्तृत्वाला बाधा येत नसते. तो इतिहास पुसला जाणार नसतो. मग मोदींनी नेहरूंचा उल्लेख टाळल्याचे दुखणे कशाला सतावत असते? नेमके तेच इतरांचे दुखणे वंदे मातरम विषयी असते. ओवायसीने वा अन्य कोणी वंदे मातरम म्हणायचे टाळले, म्हणून भारताची महानता अजिबात कमी होत नाही. पण ज्यांच्या नेहरूनिष्ठा पोकळ असतात, त्यांना तशी गरज सतावत असते. त्यांच्या मनात संघ वा मोदींविषयी जी शंका संशय आहेत. त्यामुळेच त्यांना मोदींकडून नेहरूंचा गौरव ऐकायची गरज वाटत असते. मुस्लिमांविषयी हमीद अन्सारी वा ओवायसी यांच्यासारख्यांनी जी विकृत प्रतिमा निर्माण केलेली असते, त्यातून मग अशा सक्तीची गरज निर्माण होत असते. मुस्लिमांना धर्मापुढे देश व राष्ट्र दुय्यम वाटतो, अशी समजूत ज्यांनी निर्माण केलेली आहे, त्यांनीच अशा सक्तीची गरज निर्माण केलेली आहे. सहाजिकच सक्तीचा युक्तीवाद त्यांची शुद्ध बनवेगिरी असते. म्हणूनच वंदेमातरमची सक्ती व संघाकडून सेक्युलर असण्याचे प्रमाणपत्र मागण्यात तसूभर फ़रक नसतो. दोघेही आपापल्या परीने राजकारणच खेळत असतात.

या देशातच नव्हेतर अवघ्या जगात कुठल्याही देशात मुस्लिमांच्या भावना दुखावल्या नाहीत, असे कोणी सांगू शकेल काय? जिथे सुन्नी पंथाचे राज्यकर्ते आहेत, तिथे शिया पंथीय मुस्लिमांच्या भावना दुखावलेल्या नाहीत, असे कोणी छाती ठोकून सांगू शकतो काय? इराण सारख्या शियापंथीय सत्ताधार्‍यांच्या राज्यात सुन्नी पंथीय मारले जातात वा छळले जातात. तिथे मुस्लिमांचीच गळचेपी होत असते ना? जगाच्या कानाकोपर्‍यात आज भारतातून जाऊन स्थायिक झालेले हिंदू आहेत वा तिथचे वास्तव्य करणारे ख्रिश्चन आहेत. त्यांची कोणी गळचेपी केली वा त्यांच्या भावना दुखावल्या, असे कधी आपल्याला ऐकू येते काय? भारतातल्याच नव्हेतर जगातल्या कुठल्याही देशातल्या माधमात, बिगरमुस्लिमांच्या भावनांची पायमल्ली झाली, अशा चर्चा ऐकायला मिळतात काय? नसतील, तर एक निष्कर्ष सहज काढता येतो, जगात कुठेही फ़क्त भावना मुस्लिमांनाच असतात आणि मुस्लिम नसलेले लोक व समाज भावनाशून्य असावेत. किंवा त्यांच्यापाशी धर्मभावनाच नसाव्यात. किंवा आणखी एक निष्कर्ष असा काढता येईल, की जगात अशी कुठलीही भूमी नाही वा व्यवस्था नाही, की जिथे मुस्लिम सुखाने व आनंदी जगू शकतो. कुठेही असला तरी ज्याला अन्यायच अनुभवास येतो, त्याला मुस्लिम म्हणावे अशी त्यांच्या धर्ममार्तंड वा पुरोगाम्यांची अपेक्षा आहे काय? फ़िदा हुसेन नावाच्या कुणा चित्रकाराने हिंदूंच्या दैवतांची नग्न चित्रे काढली, तेव्हा कोणाच्याच भावना दुखावल्या नव्हत्या काय? तेव्हा कोणी गळा काढला होता? आज वंदेमातरमच्या सक्तीने गळा काढणार्‍यांना तेव्हा राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्य कशाला आठवले नव्हते? तेव्हा त्यांना अविष्कार स्वातंत्र्याचे झटाके येत असतात. हा सगळा शुद्ध बनवेगिरीचा प्रकार असतो. जिथे मुस्लिम लांगुलचालन करायचे असते, तिथे राज्यघटना आणि जिथे तशी सोय नसते तेव्हा सर्वधर्मसमभाव पुढे केला जतो.

पाच वर्षापुर्वी गुजरात विधानसभेच्या निवडणूकीपुर्वी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सदभावना यात्रा म्हणून राज्यभर दौरा करत होते. तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर एक मुस्लिम मौलवी धर्ममार्तंड पोहोचला. त्याने आपल्या खिशातून एक टोपी काढली आणि मोदींच्या ‘माथी’ मारण्याचा उद्योग केला होता. मोदींनी ती टोपी सन्मानपुर्वक नाकारली. तर किती काहुर माजवण्यात आलेले होते? मोदींनी त्यांचा धर्म नसलेल्या धार्मिक टोपीला नकार दिला, म्हणजेही मुस्लिमांचा अवमान झाल्याचा गदारोळ कोण करीत होते? या देशातल्या मुस्लिमांनाच फ़क्त धर्मस्वातंत्र्य राज्यघटनेने दिलेले आहे काय? हिंदू धर्माचे पालन करणार्‍या नरेंद्र मोदींना हे स्वातंत्र्य नसल्याचे कोणी घटनेत लिहून ठेवलेले आहे काय? नसेल तर ती टोपी नाकारणार्‍या मोदींवर भावनात्मक व नैतिक दबाव आणण्याचे नाटक कोणी रंगवलेले होते? ती एकप्रकारे मोदींवर मुस्लिम टोपी घालण्याची सक्ती करणारे कोण होते? आज वंदेमारतमच्या सक्ती विरोधात गळा काढणारेच, तेव्हा मोदींवर मुस्लिम टोपीची सक्ती करीत नव्हते काय? जी टोपी तो मौलवी मोदींच्या माथी मारू बघत होता, ते नमाज करताना परिधान करायचे प्रतिक आहे. त्यातून हा मौलवी मोदींवर इस्लामचीच सक्ती करीत नव्हता काय? त्याच्या सक्तीचे उदात्तीकरण करणारे आज आदित्यनाथ योगींना शहाणपण शिकवत आहेत. एकूणच पुरोगामी बुद्धीवाद असा भामटेगिरीच्या वळणाने चालतो, त्याची ही तुरळक उदाहरणे आहेत. त्यात कोणाला मुस्लिम धर्माचे वा धर्मांधांचे लांगुलचालन दिसत असेल, तर तोही गैरसमज आहे. त्यात मुस्लिमांचे कौतुक असण्यापेक्षाही हिंदूधर्मीयांचा द्वेष सामावलेला आहे. म्हणूनच आता हिंदूत्व बाजूला पडलेले असून, राष्ट्रवाद वा राष्टनिष्ठेलाही हिंदूत्वाचे नाव दिले जाऊ लागले आहे. पण यातून हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व, हे सामान्यांच्या मनात भिनवण्याचे काम हिंदूत्वाचे विरोधकच करून देत चालले आहेत.

यातलाही विनोद समजून घेतला पाहिजे. संघ वा हिंदूत्ववादी स्वातंत्र्य चळवळीत नव्हते असा तमाम पुरोगामी सातत्याने दावा करीत असतात. तसे असेल तर वंदेमातरम किंवा तत्सम राष्ट्रवाद व त्याची प्रतिके असलेल्या गोष्टी; हा पुरोगाम्यांचाच वारसा आहे ना? मग त्याची सक्ती भाजपाचे सरकार वा तो पक्ष करणार असेल, तर त्यातून पुरोगामी वारसाच पुढे सरकवला जात आहे. मग त्याची पाठराखण पुरोगाम्यांनी व कॉग्रेसने कशाला करू नये? महात्माजींच्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटीश पोलिसांच्या लाठ्या सामान्य सत्याग्रहींनी कशासाठी झेलल्या होत्या? केवळ वंदेमातरम म्हटले म्हणूनही हजारो लोकांनी तेव्हा लाठ्या खाऊन अंगावरच्या जखमा पदकासारख्या मिरवलेल्या आहेत. ते संघवाले किंवा हिंदूत्ववादी नसतील, तर ते पुरोगामी होते ना? मग त्याच्या स्मरणार्थ होणारे राष्ट्रगान वा गुणगौरव हिंदूत्ववादी कसा होऊ शकतो? तो तर पुरोगामी वारशाचा गौरव आहे. पण त्याच पुण्याला संघ वा मोदींचा नुसता स्पर्श झाला, तरी त्याचे पाप होऊन जाते. असा काहीचा चमत्कारीक पुरोगामी युक्तीवाद झालेला आहे. नव्या युगातला नवा अस्पृष्य आता पुरोगाम्यांनी जन्माला घातला आहे. आज संघ, भाजपा वा कोणीही हिंदूत्ववादी भारतात अस्पृष्य झाला आहे आणि त्यांचा ज्याला म्हणून स्पर्श होईल, ते विटाळले गेले; अशी पक्की पुरोगामी धारणा झालेली आहे. त्यामुळेच मग आता वंदेमारतम अस्पृष्य झाले आहे. राष्ट्रवाद वा राष्ट्रप्रेम विटाळून गेलेले आहेत. स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची सक्ती स्वतंत्र भारतातला घटनाबाह्य गुन्हा झालेला आहे. किंबहूना मुस्लिम नसणे हाच पुढे गुन्हा ठरवला जावा, अशीच पुरोगाम्यांनी घटनादुरूस्ती आणली तरी को्णी आश्चर्य मानण्याचे कारण नाही. झाकीर नाईकाच्या जागी कुराण हाती घेऊन अनेक पुरोगामी कॉम्रेड समाजवाद वा कम्युनिझम शिकवू लागले, तर आपण त्यांचे तेही रुप बघायला सज्ज रहायला हवे आहे.

3 comments:

  1. भाउ मस्तच.ह्या विषयात आम्हा लोकांना नक्की काय चुक काय बरोबर ते कळत नव्हते, लेखामुळे कळाले.

    ReplyDelete
  2. भाऊ,
    येत्या पंधरा आॅगस्टला या तथाकथीत स्वातत्र्याच्या कराराला सत्तर वर्षे पुरी होतील.
    अजून तो "संवेदनशील" म्हणून गुप्ततेच्या बंधनात आहे.
    गुप्ततेची मुदत या पंधरा आॅगस्टला संपते.
    हे पुरोगामित्वाचे थोतांड संपवण्यासाठी तो करार उघड करणे हेच औषध आहे.
    वीर सावरकरांना सरकार जमा जायदाद अजून परत का दिली नाही याचे उत्तरही त्यातच आहे.
    माझे मते गांधी नेहेरूनी केलेला करार जगजाहीर करणे हीच सावरकराना व असंख्य अज्ञात व ज्ञात खर्‍या स्वातंत्रसैनिकाना खरी श्रद्धांजली ठरेल.

    ReplyDelete
    Replies
    1. अनादि मी...अनंत मी...अवध्य मी भला...

      सावरकरांवर प्रश्नचिन्ह म्हणजे सूर्याच्या तेजावर संशय घेण्यासारखे आहे...काँग्रेसला ह्याचे परिणाम भोगावे लागत आहेत...
      1.मणिशंकर अय्यर ने अंदमानातिल सावरकर ज्योत बंद केली
      2.राहुल गांधीने लोकसभेत सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले
      #congressmuktbharat

      Delete