Monday, August 7, 2017

धोक्याचा इशारा

chandigarh kundu के लिए चित्र परिणाम

हरयाणातील दोन घटना मोदी सरकारसाठी इशारा आहेत. एका घटनेत तिथल्या भाजपा नेत्याच्या मुलाने आपल्या टपोरी मित्रांसमवेत तरूण मुलीचा पाठलाग करून तिला छेडण्याची मस्ती केलेली आहे. सुदैवाने ही मुलगी एका सनदी अधिकार्‍याची कन्या असल्याने, तिने तात्काळ पोलिस संपर्क साधला आणि त्या टोळक्याला अटक झाली. पण लौकरच त्यावर झाकपाक सुरू झाली. अटकेनंतर ज्या पद्धतीची भाषा संबंधित पोलिस अधिकार्‍याने माध्यमांसमोर वापरली होती, त्यात नंतर सौम्यपणा आला आणि अटकेतून मुक्त झालेला नेतापुत्र सुखरूप घरी परतला. त्याच्यावरचे आरोप सौम्य करण्यात आले, जेणेकरून त्याला कोर्टात हजर केल्याशिवाय जामिन देता आला. आता त्यावरून काहूर माजले आहे. आणखी एक घटना काही तासातच घडली. अन्यत्र एका मंत्र्याच्या गाडीला रुग्णवाहिकेची धडक बसली. घटना फ़ारशी गंभीर नव्हती. पण त्या रुग्णवाहिकेला पुढार्‍याने रोखून धरले आणि त्यात असलेल्या जखमी व्यक्तीचा तिथेच विलंबामुळे मृत्यू झाला. अशा दोन घटनांनी भाजपानेत्यांच्या सत्ता किती डोक्यात गेली आहे, त्याची प्रचिती जनतेला आली आहे. यातही अर्थातच सारवासारव सुरू आहे. कायद्यानुसार आवश्यक कारवाई होईलच, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले आहे. असे उत्तर देण्यासाठी भाजपाचा मुख्यमंत्री वा सरकार असण्याची गरज नव्हती. अशीच उत्तरे कॉग्रेसचे भुपींदरसिंग हुड्डा देत होते, म्हणून लोकांनी त्यांना बाजूला करून भाजपाला सत्ता दिलेली आहे. त्याचे भान खट्टर वा अन्य भाजपा नेत्यांना उरलेले नाही. कालपर्यंत नेहरुगांधींच्या नावाने मळवट भरला म्हणजे सत्ता मिळते, बाकी काही जबाबदारी नसते, अशा समजुतीत कॉग्रेसवाले मस्ती करीत होते. आज तसाच काहीसा समज भाजपच्या नेत्यांनी करून घेतलेला दिसतो. अन्यथा हे दोन प्रकार इतके उजळमाथ्याने घडले नसते.

भाजपा नेत्याचा मुलगा आपल्या साथीदारांसह आलिशान गाडीतून एका मुलीचा पाठलाग करतो आणि तिला धमक्या देतो वा हल्ला करण्याचा आवेश आणतो. ही त्याची मस्ती नसते, तर बापाच्या सत्तेची नशा असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेची मस्ती दिसू नये व असू नये; म्हणून सरकारी गाड्यांवरचे लालदिवे काढून घेण्याचा निर्णय जाहिर केला. पण अंगावरचे कपडे उतरले, म्हणून सत्तेची झींग कुठे नाहिशी होत असते. आपला बाप सत्तेत आहे किंवा सत्ताधारी पक्षाचा आहे, अशी नशा चढली, म्हणजे लालदिवा असायची गरज नसते. ती मस्ती मग अंगातून बाहेर पडू लागते आणि इतरेजनांना सतावू लागते. ज्यांना आपल्या सत्तेमुळे फ़ेरबदल झाला व लोकांचे जीवन सुसह्य झाले असे दाखवायचे आहे, त्यांनी तरी निदान यातून बाहेर पडायला हवे. भाजपाकडून तशी अपेक्षा असल्याने लोकांनी त्यांना अनेक राज्यात सत्तेवर आणून बसवले आहे. पण त्याचा अर्थ भाजपाच्या नेत्यांनी व त्यांच्या आप्तस्वकीयांनी वेगळाच काढलेला दिसतो. कालपर्यंतचे कॉग्रेसवाल्यांचे चेहरे लोकांना आवडेनासे झाले होते आणि आपल्याला छळणारे भिन्न चेहर्‍याचे असावे, या अपेक्षेने लोकांनी भाजपाला सत्ता दिलीय, असा काहीसा समज या नेत्यांनी करून घेतलेला असावा. अन्यथा चंडीगडच्या त्या नेतापुत्राने पापकर्म केल्यावर त्याला वाचवण्यासाठी पिता गेलाच नसता. उलट अशा घटनेची खबर लागताच त्याने परस्पर पोलिसांना आवश्यक व योग्य असेल, ती कारवाई बेधडक करायला सांगितले असते. पण इथे उलट त्या भाजपा नेत्याने पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या पुत्राची गुन्ह्यात सहभागी असलेली गाडी घरी आणली व पुत्रालाही सौम्य कलमे लावून तात्काळ जामिन मिळण्याची तजवीज केली. इतकी महान तत्परता दाखवणारे नेते भाजपात असतील, तर लोक भाजपामुक्त भारताची घोषणा कोण करतो, याचीच प्रतिक्षा करू लागतील.

दिर्घकाळ सत्तेसाठी व विजयासाठी लक्षावधी कार्यकर्ते झटतात, तेव्हा असा विजय मिळत असतो. त्या कार्यकर्त्यांनी जनमानसात पक्षाची प्रतिमा उभी केलेली असते, ती नेत्यांच्या मस्तीची नव्हेतर जनसेवेची ग्वाही असते. तिलाच चुड लावणारे जेव्हा पक्षात येतात वा असतात, तेव्हा त्या पक्षाला अन्य कोणी पराभूत करण्याची अजिबात गरज नसते. असे मुठभर नेते वा त्यांचे आप्तस्वकीय कुठल्याही महान पक्षाला विनाविलंब धुळीस मिळवून दाखवतात. कॉग्रेसचा र्‍हास नरेंद्र मोदी व अमित शहांच्या पराक्रमाने झाला, त्यापेक्षा कॉग्रेसच्या मस्तवालपणाने केलेला आहे. अशा मस्तवालांनी कॉग्रेस आतून बाहेरून पोखरून काढलेली होती. मोदींच्या प्रयत्नांनी त्या पोखरल्या कॉग्रेसला एक मोठा दणका दिला आणि बघता बघता कॉग्रेस ढासळून पडत गेली. तो पराक्रम अशाच दिवाळखोर सत्ताधुंद लोकांनी केला होता. कॉग्रेसचा गुन्हा एकच होता, पक्षाने व नेत्यांनी अशी पापकर्मे पाठीशी घालण्यात धन्यता मानली. आज नेमके तेच चंडीगडच्या भाजपा नेत्यांनी केलेले आहे. उलट अशा बाबतीत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून, त्या नेतापुत्राला पुन्हा अटक करण्याचे आदेश द्यायला हवे होते. तरच भाजपा किती वेगळा आहे, त्याची प्रचिती लोकांना आली असती. पण तसे झालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही, तर कॉग्रेसी छापाचे जुनेच उत्तर दिलेले आहे. त्यामुळे बंगाल, केरळ वा तामिळनाडू जिंकण्याची आपली स्वप्ने बाजूला ठेवून मोदी-शहांनी अगोदर जिंकलेल्या प्रांतातील आपल्याच मोकाट सुटलेला सत्ताधुंद वळूंना लगाम लावण्याचे काम हाती घेतले पाहिजे. अन्यथा २०१९ वा इतर निवडणूकात त्यांचा केजरीवाल व्हायला वेळ लागणार नाही. दिल्लीच्या शहरी राज्यातील इवल्या सत्तेची मस्ती चढलेल्या केजरीवालनी असेच पापाकर्मी पाठीशी घातले आणि दिल्लीकरांनी त्यांना दोन वर्षात धडा शिकवलेला आहे.

मोदी-शहा पक्षाचा व प्रभावक्षेत्राचा विस्तार करण्यात गर्क आहेत. पण जिथे त्यांना लोकांनी प्रतिसाद दिला आहे, त्या जनतेचा विश्वास कायम राखण्यालाही प्राधान्य दिले पाहिजे. कारण त्याच विश्वासाच्या आधारावर पुढली भक्कम वाटचाल होत असते. अशा विश्वासाला तडे देणारे म्हणूनच नजिकचे शत्रू वा घातपाती असतात. ज्या नेत्याच्या पुत्राने असा उद्योग केला, तो भाजपाचा सर्वात जवळचा शत्रू असतो. त्याला पाठीशी घालण्यातून पक्षाची व नेतृत्वाची प्रतिमा मलीन व्हायला हातभार लागत असतो. राहुल गांधी यांची पादत्राणे उचलून निष्ठा दाखवणारे वा मुजोरी करून जनतेला हैराण करणार्‍यांनी कॉग्रेस बुडवली आहे. किंबहूना त्यांना राहुल सोनिया पाठीशी घालत गेल्या, त्यातून त्या पक्षाचा बोजवारा उडालेला आहे. मायावती वा मुलायमच्या पक्षालाही त्यातूनच पराभवाला सामोरे जावे लागलेले होते. प्रजापती नावाचा मंत्री धुमाकुळ घालूनही त्याला अखिलेश आवर घालू शकला नाही. त्याची किंमत समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशात मोजली. किंबहूना अशाच दुष्टचक्रात फ़सण्याला घाबरून नितिशकुमारनी लालू व कॉग्रेसची साथ अलिकडेच सोडली. त्यापासून धडा घेतला नाही, तर भाजपाने अन्य कोणाला हरवण्याच्या कल्पना सोडून द्याव्या. पक्षातूनच भाजपाला पराभूत करणारे सोकावत चालले असतील, तर इतरांना संपवण्याची भाषा कामाची नसते. लोकांचा विश्वास संपादन करणे एकवेळ सोपे आहे, पण तो विश्वास टिकवण्यासाठी सातत्याने चांगली उदाहरणे पेश करावी लागतात. चंडीगड व हरयाणातील दोन ताजे नमूने जनतेला भयभीत करणारे आहेत. असे अस्तनीतले निखारे संभाळत मोदी वा भाजपाला दिर्घकाळ देशात राज्य करता येणार नाही. सत्ता टिकवण्याची गोष्ट दूर राहिली. देशाला कॉग्रेसमुक्त करण्यापेक्षा आधी भाजपाला गुन्हेगारमुक्त करण्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.

9 comments:

  1. bhau add share button on blog. whats app, facebook, blog, twitter button to share your great thoughts.

    ReplyDelete
  2. ती मुलगी आणि ते दोघे हे सगळे फेसबूक फ्रेंड्स आहेत, त्यांचे फोटो आहेत. असे कळल्यावर तातडीने त्या पोरीने फोटो डीलीट केलेत. ती गुरमेहेर कौर ची मैत्रिण आहे. तिचे वडील , IAS ऑफिसर आहेत ,ते हुडा यांच्या जवळचे मानले जातात. परवा निघालेल्या बदलीचेया ऑर्डर मधे ह्यांचे पण नावआहे.
    ह्या स्टोरीत बरेच मीसींग डॉट्स आहेत. ते जोडल्यावर हा सगळा प्रकार बहूदा वेगज्ळाच काहीतरी असावा.

    ReplyDelete
  3. हे तर भाजप मध्ये काँग्रेस संस्कृती येण्याचे लक्षणे दिसत आहे

    ReplyDelete
  4. मोदींनी 2014 साली म्हटले होते की जसे भाजपा सत्तेत येईल संसद गुन्हेगार मुक्त करण्यास सुरुवात होईल, पण तसं काही दृश्य अजून पर्यंत दिसत नाहीये(बहुदा पुढच्या निवडणुकीसाठी हा मुद्दा राखून ठेवण्यात आला असावा).
    त्याउलट भाजपा मध्ये बहुतेक राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा पक्ष प्रवेश झाला आहे(महाराष्ट्रात सुद्धा)...
    काय म्हणावं याला?? विश्वासघात?

    ReplyDelete
  5. भाऊ अत्यंत समर्पक लेख ..
    असे खडे बोल बेलणारे कणखर नेतृत्व भाजपचे असुन सुद्धा अशा घटना घडतात हे अंत्यत लाजीरवाणे आहे. संघ शिस्तीचे दाखले देणार्या हे शोभत नाही.
    अशा केवळ 2-4 घटना नी भाजप सारखा अत्यंत अल्प अनुभव असलेला पक्ष लोकसभा निवडणूकीत सहज पराभुत होऊ शकतो. आणि हेच फाॅरेन मालकी असलेल्या पेड मिडिया व त्यांच्या मालकांना पाहिजे आहे. असे कणखर राष्ट्रवादी नेतृत्व भारता सारख्या सुजलाम सुफलाम खंडप्राय देशाला मिळणे हिच खरी इतर राष्ट्रांची पोटंदुखी आहे.
    त्याचमुळे पुढील दिड वर्षांत असे अनेक प्रसंग सहज निर्माण होऊन परत एकदा भ्रष्टाचारी, कमकुवत, राष्ट्रविके व लंपट नेतृत्वाखाली (पक्षांनी मिळुन ) देश जाऊ शकतो..
    मिडियावाले एका बाजुने प्रिंन्स व अखलाक, सारखा बागुलबुवा व दुसर्या बाजुने महागटबंधनचा गाजरी पर्याय जनतेला दाखवून बिहार प्रमाणे सहज जनमत फिरऊ शकतो. याचे प्रात्यक्षिक झालेले आहे.
    आता याचाच मोठा पट कदाचित तयार करण्यात आलेला असेल. व टप्प्या टप्प्यांत केला जाइल व मोदी शहा सारख्या मानवांना हे आवरणे अशक्यच आहे.
    यातच भर म्हणुन अनेक काँग्रेसी व इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते भाजपत सामील झाले आहेत यांना फितवुन व साथीने सहज कल्लोळ माजवला जाऊ शकतो.
    व मोदी सरकारची बाहेरुन भक्कम दिसणारी नौका लोकसभा निवडणूकीत सहज डुबु शकते व हे सत्तेचा फायदा घेणारे उंदीर भ्रष्टाचार न करु शकल्याने उपासमार होऊन बोटीतुन पटापट उड्या मारुन बाहेर पडतील. व साधुवाण्याच्या नौके प्रमाणे मोदींची नौका फुला पाण्याने भरलेली होऊ शकते. कारण भाजपा किंवा कोणताही (अगदी 1971 मधला इंदिरा गांधी च्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष ) राष्ट्रवादी राष्ट्रभक्त पक्ष जगाला भारताचा सत्ताधारी पक्ष म्हणुन नको आहे. त्यांना देशाशी गद्दारी करणारेच लंपट नेतृत्व पाहिजे आहे म्हणजे सत्तेत भागिदारी करून लुटमार करता येते व दुसरीकडे स्वार्थी व मश्गुल व गरिब व मजबुर जनतेला सहज भुलवुन/प्रलोभने दाखऊन दशकांनु दशके राज्य करता येते..
    या घटना याचीच चाहुल देतात..
    भाऊ तुम्ही कान टोचणी बरोबर केलेली आहे....
    Aks

    ReplyDelete
  6. भाऊ खरेच प्रत्येक वेळी भाजपला म्हणुनच सत्तेवर आणले आहे ही एक मेहेरबानीच आहे असे दाखवले जाते परंतु हिच अशीच लोकशाही अपेक्षित आहे हे आपण विसरतो कारण जनता पण त्याच लायकीची आहे कारण जनप्रतीनीधी हे जनतेचाच भाग आहेत पण वाल्यां कोळ्याच्या कुटंबा प्रमाणे कोणीही पाप आपल्या वर घ्यायला तयार नाही कारण हेच रामायण आपल्याला हजारो वर्षे शिकवले आहे. व राम राज्य केवळ काही वर्षेच भारतावर राहिले आहे.
    पण जनता अशा गोष्टी कडे दुर्लक्ष करेल व मोदी सरकारने जर कडक कारवाई केली तर साथ देइल अशी अपेक्षा जोपर्यंत आत्ताचा पार्सीलीटी वाला मिडिया आस्तीतवात आहे तोपर्यंत देता येत नाही.
    एका बाजुने पाक काश्मिर दुसर्या बाजुने चिनी, तर देशांतर्गत प्रगती चा लेखांक, महागाई ( टाॅमेटो कांदा डाळ पण खंबीर सरकार पाडु शकते कीती पोकळ लोकशाही अ
    आहे भारताची) गरिबी, न्याय व्यवस्था लचके तोडत असताना
    या सर्व कसोटीला मोदी कसे हँडल करतात हे पहावं लागेल.
    व 2019 ला मोदी सरकार परत सत्तेवर आले तर जादु झाली म्हणावे लागेल व भारताचे अहम भाग्य. भाऊ आपल्या सारखे आहेत म्हणुन देशाचे भाग्य आहे.
    Aks

    ReplyDelete
    Replies
    1. आहा हा हा कांदा बटाटा डाळी नी कोलमडणारी जगातली मोठी भारतीय लोकशाही...
      आणि वाल्यां कोळीच्या कुटुंबा प्रमाणे आपल्यातील जनप्रतीनीधी चे पाप झटकारे भारतीय मतदार

      Delete
  7. Really what u said is very much true Bhau, being member of BJP for longtime, i too get disturbed when i see news reports on tv and feel really annoyed and ask myself for this only we work for bjp for all these years when no one was counting bjp

    ReplyDelete