Wednesday, May 9, 2018

अतिशहाणा त्याचा ...............


एका दुर्गम खेड्यातली गोष्ट आहे. काही कामानिमीत्त शहरातला एक प्राध्यापक पत्रकार असा कोणी शहाणा त्या खेड्यात जातो. मात्र ज्या वस्तीत त्याला पोहोचणे आवश्यक असते, तिथे जायला शहराप्रमाणे टॅक्सी वा रिक्षा उपलब्ध नसते. एका बसने प्रवास करून हा शहाणा हमरस्त्यावर उतरतो आणि चौकशी करतो. तर खेड्याकडे जाणारी बस आणखी तीन तासांनी येणार असते आणि समोरून एक बैलगाडी चाललेली असते. त्यालाच हा शहाणा हटकतो आणि चौकशी करतो. तो गाडीवान त्याला सोडायला राजी असतो. घासाघीस करून शहाणा बैलगाडीत स्वार होतो. कसल्याही सीटशिवायचा प्रवास खडतर असतो. म्हणून विरंगुळ्यासाठी शहाणाच पुढाकार घेऊन बोलू लागतो. पण त्या खेडूताकडून त्याला फ़ारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या शहाण्याची गोची होते. अखेरीस तो गाडीवानाला म्हणतो, तुम्ही एक प्रश्न विचारा मी तुम्हाला उत्तर देईन. तर गाडीवान म्हणतो आम्ही अडाणी तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना कसले प्रश्न विचारणार? आमची अक्कल ती काय? तुम्ही शिकलेली माणसे. ती शांतता व बैलगाडीचा खडखडाट शहाण्याला अस्वस्थ करीत असतो. त्यामुळे त्याला कोणाशी तरी बोलायची खाज शांत बसू देत नाही आणि गाडीवान तर अधिक काही बोलायला राजी नसतो. त्यामुळे त्याला काही आमिष दाखवून बोलता करायची युक्ती शहाण्याला सुचते. तो गाडीवाल्याला म्हणतो, माझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाहीस तर तू मला दहा रुपये द्यायचे आणि तूझ्या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही तर तुला शंभर रुपये देईन. गाडीवान आधी खिसे चाचपतो आणि दहाची नोट असल्याची खातरजमा करून घेतो. हा शहाणा इतका आत्मविश्वासाने भारावलेला असतो की गाडीवानालाच पहिला प्रश्न विचारण्याची संधी देतो. खुप डोके खाजवून झाल्यावर गाडीवान प्रश्न विचारतो

साहेब, आमची अक्कल व बुद्धी तोकडी, आम्ही काय तुम्हाला प्रश्न विचारणार? पण माझी एक शंका दूर करा, जगात इतके प्राणीपशू आहेत, त्यापैकी कुठला प्राणी असा आहे, ज्याला पाच पाय आहेत, माशासारखे तोंड आहे आणि तो आकाशात पंखाशिवायही उडू शकतो? हा प्रश्न ऐकून शहाणा गोंधळून जातो. त्याने असा कुठलाही प्राणी कधी ऐकलेला नसतो. काही मिनीटे शांततेत जातात आणि ती शांतता शहाण्याला रडकुंडीला आणते. गाडीवान शांत असतो आपल्या बैलांना चाबुक हाणून आणि रस्त्यातले खड्डे चुकावून गादी हाकत असतो. त्याला उत्तराची घाई नसते की चिंता नसते. अस्वस्थ शहाणाच शेवटी कुतूहलाने विचारतो, तूला असा प्राणी ठाऊक आहे काय? मागे वळून मंद स्मित करीत गाडीवान म्हणतो, म्हणजे तुम्हाला ठाऊक नाही तर? आता शहाणा आणखीनच खजील होतो. आपले सगळे शिक्षण शहाणपण वाया गेल्यासारखे त्याला वाटते. काही मिनीटे पुन्हा शांतता असते आणि ती असह्य झालेला शहाणा कोटाच्या खिशातून शंभराची नोट काढून गाडीवानाला देतो. हरलो म्हणायचीही त्याच्यापाशी हिंमत उरलेली नसते. ती नोट काळजीपुर्वक आपल्या बंडीच्या आतल्या खिशात ठेवल्यावर गाडीवान म्हणतो. कमाल झाली साहेब तुमच्या ज्ञानाची! इतकेही ठाऊक नाही तुम्हाला? आता मात्र शहाणा संतापलेला असतो. गाडीवानाला म्हणतो, माझ्या ज्ञानाची गोष्ट सोडून दे, प्राणीशास्त्राच्या अभ्यासात किंवा अन्यत्र असा कुठला प्राणी मी वाचलेला ऐकलेला नाही. आता तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. ज्या प्राण्याचे तू वर्णन सांगितलेस, तो प्राणी कोण व कुठे आढळतो ते सांग! तो गाडीवान चाबुक बाजूला ठेवून खिशात हात घालतो, आधीच चाचपून बघितलेली दहाची नोट काढून शहाण्याला देतो आणि म्हणतो, मला माहिती असती तर गावात बैल कशाला हाकले असते? हे घ्या दहा रुपये. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतेच असे नाही ना राव?

गाडी थांबते आणि गाडीवान समोरचया वस्तीकडे बोट दाखवून शहाण्याला म्हणतो, तीच तुम्हाला हवी असलेली राणेवस्ती! काही क्षण शहाणा उठून उतरूही शकत नाही. कुठलेही कारण नसताना आपण नव्वद रुपये का गमावले, अशा प्रश्नाचे उत्तर त्याला सापडत नसते. ज्याला आपण गावठी अडाणी समजत होतो, त्याने हातोहात आपली अशी फ़सवणूक केली, हे त्याच्या आता लक्षात आलेले असते. पण उपाय नसतो. कारण पैजेचा खेळ त्यानेच सुरू केलेला असतो. आपला शहाणपणा मिरवण्याच्या नादात त्याने एका सामान्य बुद्धीच्या गावकर्‍याकडून आपलीच फ़सगत करून घेतलेली असते. पुस्तकातले शहाणपण आणि जगण्यात धक्केबुक्के खाऊन मिळवलेली अक्कल, यातला असा फ़रक असतो. बैलगाडीतून शांतपणे फ़ुकटचा प्रवास करायचे सोडून आपली अक्कल पाजळण्याची त्या शहाण्याला काहीही गरज नव्हती. पण शहाणपणा ही मिरवण्याची वस्तु झाली मग फ़सगतीला आमंत्रण दिले जात असते. जगात मिरवणार्‍या शहाण्यांची अशीच नेहमी नाचक्की होत असते. खास करून अन्य कोणाला अडाणी अज्ञानी वा मुर्ख ठरवण्याच्या स्पर्धेत शहाण्यांचा नेहमी पराभव होत असतो. त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री बिप्लव देव किंवा गुजरातचे विजय रुपानी यांच्यापासून केंद्रीय मंत्री सत्यपालसिंग यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरलेली आहेत. त्यांची खिल्ली उडवून आपले शहाणपण मिरवण्याची स्पर्धा बुद्धीवादी वर्तुळात चाललेली असते. देशातल्या सर्व गावखेड्यांचे विद्युतीकरण पुर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी सांगताच कुठल्या चार गावात वीज अजून पोहोचली नाही, त्याचे तपशील सादर करणारा शहाणा यापेक्षा वेगळा नसतो. त्याला आपण सत्यपाल वा मोदींपेक्षा शहाणे असल्याचे समाधान मिळवायचे असते आणि मिळतेही. पण त्यामुळे व्यवहारात त्याला काहीही लाभ होत नसतो. कारण अशी विधाने कोणी कुठे केली, तो संदर्भ सोडून त्याचे परिशीलन गैरलागू असते.

पहिली गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की बिप्लव देव जिथे व ज्या लोकांसमोर अशी विधाने करत असतो, तेव्हा त्याला विज्ञान वा सत्याची चाड ठेवण्याचे कारण नसते. त्या लोकांना तेच ऐकायचे असते आणि म्हणून त्याला टाळ्या मिळत असतात. विजय रुपानी वा सत्यपाल सिंग यांनाही टाळ्या व पर्यायाने मते मिळवायची आहेत. आपले विधान बुद्धीमंतांनी वा शहाण्यांनी स्विकरावे आणि आपला गौरव करावा, अशी त्यांची बिलकुल अपेक्षा नसते. हा नियम जसा सामान्यबुद्धींच्या लोकांना लागू होतो, तसाच तो कुशाग्र बुद्धीच्या लोकांसाठीही तितकाच परिपुर्ण असतो. अगदी विज्ञानाचे गोडवे गाणारेही तितकेच अंधभक्त असतात, जितके सामान्य लोक कुठल्या बुवा देवस्थानाच्या अंधश्रद्धेत रमलेले असतात. काही वर्षापुर्वी महान शास्त्रज्ञ वैज्ञानिक स्टीफ़न हॉकिन्स याने जगाच्या निर्मितीचा सिद्धांत म्हणून बिग बॅंग थिअरी मांडलेली होती. विनाविलंब एकाहून एका महान वैज्ञानिकांनी त्याच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या होत्या. कोणीही त्याला आव्हान देण्याची हिंमत केली नाही. किंबहूना त्याचा सिद्धांत कुठल्याही पुराव्याशिवाय स्विकारला गेला होता. पण कुठलाही पुरावा दिलेला नाही म्हणून त्या सिद्धांताला आव्हान देत पुरावे मागणारा एक कनिष्ठ संशोधक भारतीय होता. त्याचे कोणी गुणगान केले होते काय? आज बिप्लव देव किंवा विजय रुपानी यांची खिल्ली उडवणारे जितके शहाणे आहेत, त्यांची अंधभक्ती तशीच आहे. ते विज्ञानाच्या काही प्रस्थापित सिद्धांताच्या आहारी गेलेले अंधभक्त आहेत. कुठलाही विज्ञानाचा सिद्धांत जुना होऊन खोटा पडण्यापर्यंतच खरा असतो आणि म्हणूनच त्याला मिळणारे आव्हानही वैज्ञानिक असते. त्याची खिल्ली उडवणे शहाणपणाचे लक्षण नसते. तर त्याची छाननी तपासणी हा वैज्ञानिक दृष्टीकोन असू शकतो. पण आज त्याचाच शहाण्या वर्गामध्ये दुष्काळ पडलेला आहे. म्हणून रुपानीची खिल्ली उडवण्यात शहाणपणा शोधला जातो.

आता लिओनार्डो सुस्किंड नावाच्या शास्त्रज्ञाने हॉकिन्सला खोटा पाडले आहे. पण २००० सालात़च आभास मित्रा नावाच्या भारतीय शास्त्रज्ञानेही हॉकिन्सला नाकारले होते. तर त्याच्या वाट्याला बिप्लव देव किंवा रुपानी यांच्यासारखीच हेटाळणी आलेली होती. आभास मित्रा हा भाभा अणू संशोधन केंद्रातला एक कनिष्ठ संशोधक होता आणि त्याने २००० सालाच्या सुमारास एका जागतिक किर्तीच्या नियतकालिकात हॉकिन्सच्या सिद्धांताला मुद्देसुद आव्हान दिलेले होते. त्याचा तो शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि खळबळ माजलेली होती. पण त्याची दखल कुणा संपादक माध्यमांना घ्यायची गरज वाटलेली नव्हती. केवळ वैज्ञानिक क्षेत्रातच ही खळबळ मर्यादित होती. पण तिथेही त्याच्या वाट्याला हेटाळणीच आली. कारण हॉकिन्स हे विज्ञानातील जागतिक शंकराचार्य वा पोप होते. त्यांचा शब्द खोटा पाडण्याची या आभासने हिंमतच कशी केली? भारतातील अनेक विज्ञाननिष्ठांनी आभासवर टिकेची झोड उठवली आणि खुद्द भाभा अणू संशोधन केंद्रातही त्याला त्याचा त्रास बहिष्कार सहन करावा लागला होता. त्याच्या भोवतालातले अनेक सहकारी त्याच्याशी बोलाय़चे बंद झाले आणि त्याला एकाकी पडावे लागलेले होते. पण त्याने पर्वा केली नाही. इतक्या वर्षांनी अखेरीस हॉकिन्सचा सिद्धांत खोटा पडला आणि त्यानेही आपली चुक मान्य केली. कारण आणखी दहा वर्षांनी त्यावर अधिक संशोधन होऊन सिद्धांत पोकळ ठरला होता. पण एकदा हॉकिन्सची भक्ती सुरू केली, मग विज्ञान व त्यासाठी आवश्यक असलेला विवेक यांचा गळा घोटावा लागत असतो. इथेही तेच झालेले होते. असे जे लोक आभास मित्रावर तुटून पडलेले होते. त्यांना विज्ञानातील सत्य वा वास्तवाशी अजिबात कर्तव्य नव्हते. वैज्ञानिक पंथ-धर्मात आपल्याला स्थान हवे असल्यास त्यातील मठाधीशांनी केलेली पोपटपंची तोंडपाठ असावी लागते ना?

आजच्या इतकी माध्यमे वाहिन्या त्या काळात विस्तारलेल्या नव्हत्या. म्हणून आभास मित्राची अशी जाहिर खिल्ली उडवली गेली नव्हती. अर्थात आभास मित्रा आणि बिप्लव देव, रुपानी यांच्यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. हे दोघे राजकीय नेते आहेत आणि आभास संशोधक होता. पण दोघांच्या वाट्याला आलेली हेटाळणी आणि त्या हेटाळणीचे म्होरके मात्र एकाच जातकुळीचे आहेत. त्यापैकी कोणालाही सत्याशी वा वास्तवासह विज्ञानाशी कर्तव्य नसते. तर जी प्रस्थापित व्यवस्था व समजूत आहे, त्यात आपले स्थान पक्के करायचे असते. मग त्यासाठी पीठाधीश वा मठाधीश असतात, त्यांची भक्ती आवश्यक असते. अपरिहार्य असते. त्यानुसार घटनाक्रम चालत असतो. आताही महाभारत काळात इंटरनेट नव्हते याविषयी शहाणे किती आत्मविश्वासाने बोलत आहेत ना? जणू यापैकी प्रत्येकजण महाभारताच्या कालखंडात तिथे व्यक्तीगतरित्या उपस्थित असल्याचा हवालाच देण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. आपल्याला नको असलेले नाकारणे म्हणजे विज्ञान नव्हे, इतकाही विवेक असल्या लोकांपाशी नाही. तेव्हा इंटरनेट वा अन्य काही नसल्याची हमी कशी दिली जाऊ शकते? वेदातल्या विमानाची अशीच खिल्ली उडवली जाते. पण साधा विषय इतकाच आहे, की कुठलाही कल्पनाविलास करण्यासाठी किंचित का होईना वास्तवाचा आधार असावा लागतो. माणूस उडण्य़ाची स्वप्ने बघत असतो व त्यातून विमानाची कल्पना विकसित होते. रामायणात वा पुराणकथांमध्ये पुष्पक विमानाची कल्पना मग कुठून आली? इतक्या मागास पुरातन काळात पशूवत जीवन जगणार्‍यांनी या चमत्कारीक कल्पना कशाच्या आधारे केलेल्या असतील? परक्या ग्रहावर किंवा सूर्यमालिकेच्या पलिकडे सजीव वा मानवी वस्ती शोधण्याची तरी मग गरज काय आहे? विज्ञानाला सर्वकाही अचुक सापडलेले आहे आणि गणित पक्के आहे, तर कल्पना चावलाचा अपघात तरी कशाला झाला?

विज्ञान अचुक नसते आणि कुठलेही गणित फ़क्त कागदी असते. ते आपल्यालाच संपुर्ण समजले असल्याचा दावा करणारा तद्दन मुर्ख असतो. जितके बिप्लव देव वा विजय रुपानी हास्यास्पद असतात, तितकेच त्यांची टवाळी करणारेही अर्धवट असतात. कुतूहलाने विविध शोध लागलेले आहेत आणि कुठलीही कल्पना नाकारण्यातून विज्ञानाचा विकास होऊ शकलेला नाही. निसर्गाच्या अनाकलनीय रहस्यांचा शोध घेत विज्ञान पुढे सरकलेले आहेत आणि वाळूच्या ढिगातले काही कण म्हणजे आजचे विज्ञान आहे. त्याला जितकी रहस्ये उलगडलेली आहे, त्याच्या अब्जावधी पटीने अनेक रहस्ये दडलेली आहेत. ती शोधण्याने विज्ञान विकसित होऊ शकते. आपल्याला अंतिम सत्य गवसल्याचा दावा किंवा टेंभा, अडाणीपणाचे लक्षण असते. प्रत्येकजण आपल्या आवाक्यानुसार व आकलनानुसार बोलत असतो. बिप्लव देवची अक्कल आहे तितके तो बोलला असेल. पण त्याची खिल्ली उडवून स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्ह्णवून घेणारे अधिक शहाणे वा विज्ञानादृष्टीच्र आहेत, असे मानायचे अजिबात कारण नाही. उलट ते अधिक निर्बुद्ध आहेत. कारण त्यांच्यापाशी प्रस्थापिताला आव्हान देण्याची हिंमत नाही, जी आभास मित्रापाशी होती. गॅलिलीओ अशीच पोपची खिल्ली उडवत राहिला असता, तर जग इतके पुढारले नसते. कारण त्याच्या काळात पोप व बायबल हेच विज्ञान होते आणि त्यांच्याशी हुज्जत करण्यात गॅलिलीओने आपले आयुष्य खर्ची घातले नाही. कारण तो खरा विज्ञाननिष्ठ होता. अशा मुर्खांची माफ़ी मागून तो पुढे जात राहिला. बिप्लव देव वा तत्सम लोकांच्या विधानांवर आपली बुद्धी खर्ची घालणार्‍यांची म्हणूनच कींव करावीशी वाटते. कारण त्यामुळे विज्ञानाचे वा मानव समाजाचे नुकसान होत नसते की कुठला लाभ मिळत नसतो. अशा शहाण्यांपेक्षाही म्हणून तो अडाणी खेडूत गाडीवान अधिक हुशार असतो. तो बैलाला जुंपून काम घेतो. बैलाचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात कालापव्यय करीत नाही.

2 comments:

  1. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगांव सीमाप्रश्न आणि तेथील मराठी भाषिकांची छळवणूक यावरही एक लेख लिहावा ही विनंती

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    लेख पटला. फक्त पोप व शंकराचार्य यांना एका रांगेत बसवलेलं जरासं अनाठायी वाटलं. कारण की पोपच्या हाती अफाट सत्ता आहे. याउलट शंकराचार्यांची सत्ता मठाबाहेर चालंत नाही. त्यामुळे स्टीवन हॉकिन्सची पोपशी तुलना व्हायला पाहिजे, शंकराचार्यांशी नको.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete