Saturday, May 5, 2018

भाजपा जिंकेल, पण येदींचे काय?

yeddyurappa के लिए इमेज परिणाम

मे महिन्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कर्नाटकात विधानसभेच्या प्रचारात उडी घेतली आहे. त्यामुळे आता खरी कुस्तीची दंगल सुरू होईल. कारण इतके दिवस लहानसहान पहेलवान आरंभीच्या कुस्त्या खेळत होते आणि रिंगणाच्या बाहेर बसलेले अभ्यासक विश्लेषक टाईमपास करत होते. आता विधानसभा लढतीला खरी रंगत येणार आहे. आपल्या विरोधात वा पक्षाच्या भूमिकेवर काय टिका होऊ शकते, त्याचा अंदाज मोदींनी घेतला आहे. कॉग्रेस व देवेगौडांच्या जनता दल सेक्युलर पक्षाचा पवित्रा समोर आलेला आहे. सर्वांचे उमेदवार व लढती स्पष्ट झाल्या आहेत. सहाजिकच पटावरची मांडणी संपली आहे. आता एक एक चाल व डाव सुरू होईल. अर्थात मतचाचण्या घेणार्‍यांनी आपले अंदाज देतानाही ‘अजून मोदी मैदानात आलेले नाहीत’ अशी पुस्ती जोडलेली होती. सहाजिकच प्रचाराचे अखेरचे नऊदहा दिवस शिल्लक उरले असताना खरी लढत सुरू झालेली आहे. त्यात प्रचाराची रणधुमाळीच नव्हेतर अपप्रचाराची राळ उडणार आहे. युक्तीवाद व प्रतिवादाची झोंबाझोंबी जोरात सुरू होणार आहे. सगळे राजकारण व प्रचाराचा भोवरा आपल्या भोवतीच फ़िरत रहावा, ही मोदींनी खरी रणनिती असते आणि विरोधक कायम त्याचेच बळी होतात. पण त्यातून काही धडा घेत नाहीत. तसे असते तर राहुल गांधींनी महिनाभर आधी आखाड्यात उडी घेतली नसती. आपले बहुतांश पत्ते मोदी व भाजपासमोर खुले करून ठेवले नसते. महिनाभर राहुल कर्नाटकात पळापळ करीत आहेत आणि त्यांचा बहुतांश रोख थेट मोदीविरोधी राहिला आहे. पण त्यांच्या कुठल्याही आरोप आक्षेपाला मोदींनी चकार शब्दाने उत्तर दिलेले नव्हते. सहाजिकच आता मोदी काय बोलतील व कसे उत्तर देतील, त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आपल्या भाषणाची व भूमिकेची लोकांनी प्रतिक्षा करावी व आपण धमाल उडवावी; ही नवी रणनिती अजिबात नाही. मग कर्नाटक कुठल्या दिशेने जाईल?

मागल्या दोन महिन्यात अमित शहा व एकूण भाजपा यंत्रणेने राहुलशी दोन हात आपल्या परीने केलेले आहेत. पण तेवढ्या काळात जे अंदाज व चाचण्या आल्या, त्यात आघाडीवर दिसणार्‍या कॉग्रेसशी भाजपाने महिन्याभरात बरोबरी तरी साधलेली आहे. थोडक्यात मर्यादित षटकांचा सामना किंवा २०-२० सामन्यात सलामी दिली जाते व नंतर मधल्या फ़ळीतील खेळाडूंनी आपला जम बसवायचा असतो. त्यापेक्षा भाजपाची आजकालची रणनिती अजिबात भिन्न नाही. राहुल व कॉग्रेस प्रचाराला लागताच भाजपाचे स्थानिक नेते प्रचारात उतरले होते. स्थानिक आघाडी येदीयुरप्पा संभाळत होते आणि पक्षाध्यक्ष अमित शहा मतदारसंघ हे युनीट समजून बुथनुसार नियोजन करीत होते. पण राहुलनी सभा सुरू केल्यावर अमित शहा मैदानात आले आणि कॉग्रेसपाशी नवी कुठली तोफ़ शिल्लक राहिलेली नाही. या सगळ्या काळात भाजपाने नरेंद्र मोदी हे आपले भेदक अस्त्र मागे ठेवलेले होते. नेहमी अशा मोक्याच्या क्षणी मोदींना मैदानात आणले जाते आणि तोपर्यंत विरोधकांच्या भात्यातील सगळे लक्ष्यवेधी बाण संपून गेलेले असतात. अखेरच्या हाणामारीसाठी काही भेदक अस्त्रे शिल्लक ठेवावी, एवढेही मोदी विरोधकांना अजून लक्षात येत नाही, ही मोदींची जमेची बाजू झालेली आहे. हेच उत्तरप्रदेशात झाले आणि तेच त्रिपुरात घडताना दिसले. पण ते ओळखून त्याला प्रत्युत्तर देण्याचा विचारही इतरांच्या डोक्यात येणार नसेल, तर भाजपाला हे लोक पराभूत कसे करणार; हा गहन प्रश्न आहे. आताही कर्नाटकात येदीयुरप्पा हा भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा मुद्दा कॉग्रेसने निर्णायक मानला आहे. पण येदीयुरप्पाना पुढे करणारा भाजपा खरोखरच त्या चेहर्‍यावर लढतो आहे काय? नेता भ्रष्ट म्हणून पक्ष मतदानात पराभूत होतो काय? असेल तर लालूप्रसाद तुरूंगात असतानाही फ़रक कशाला पडत नाही? कॉग्रेसचे वीरभद्रसिंग का जिंकले होते?

सात वर्षापुर्वी हिमाचलच्या निवडणूका होण्यापुर्वी वीरभद्रसिंग केंद्रात मंत्री होते आणि त्यांना कसल्यातरी प्रकरणात सीबीआयने आरोपी बनवले, म्हणून राजिनामा द्यावा लागला होता. मग त्यांची सोय म्हणून त्यांना हिमाचल कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले गेले आणि लगेच आलेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनीच पक्षाचे नेतृत्व केलेले होते. अशा ताज्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वीरभद्रसिंग कॉग्रेसला पराभवाकडे घेऊन गेले नाहीत. उलट त्यांच्याच नेतृत्वाखाली कॉग्रेसने त्या राज्यात बहूमत व सत्ता मिळवली होती. नारदा-शारदा असल्या आरोपाच्या विळख्यात असतानाही ममतांनी एकट्याच्या बळावर बंगाल दुसर्‍यांदा जिंकला आणि तामिळनाडूने जामिनावर सुटून आलेल्या जयललितांना पुन्हा बहूमत दिले. थोडक्यात आरोपांची व अपप्रचाराची धमाल उडवून कुठल्या पक्षाला वा नेत्याला सत्ताभ्रष्ट करता येत नाही, की सत्तेला वंचित ठेवता येत नाही. त्यापेक्षा उत्तम कारभाराची व कामाची आपली कल्पना लोकांसमोर मांडावी लागते. कॉग्रेसचे दुर्दैव असे आहे, की राहुलना कर्नाटकात नागरिकांना ओढून घेण्याचे मुद्दे ठाऊक नाहीत आणि सिद्धरामय्यांना आपण किती महान काम केले, तेही सांगता येत नाही. सहाजिकच त्यांचा भरवसा स्वत:पेक्षा येदीयुरप्पांच्या बदनामीवर अधिक आहे आणि तिथेच मोदींचे काम सोपे होत असते. कुठलाही पक्ष आला तरी भ्रष्टाचार करतो आणि स्वच्छ कारभाराचे आमिष हा निव्वळ दगाफ़टका असतो, हे आता सत्तर वर्षांनी सामान्य मतदार शिकलेले आहेत. त्यामुळे भ्रष्ट मुख्यमंत्री त्यांना चालतो, पण नाकर्ता नको असतो. हे ज्याला समजलेले असेल त्यालाच निवडणूका जिंकता येत असतात. राहुलना त्याचा थांगपत्ता नाही आणि कॉग्रेसला त्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षाही मजेशीर गोष्ट म्हणजे हिमाचल वा झारखंडात भाजपाने खेळलेला एक डावही या मुर्खांच्या लक्षात आलेला नाही.

हिमाचल व झारखंडात भाजपाने कॉग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली, तेव्हा तिथेही भ्रष्ट चेहरा असलेले नेतेच पुढे केलेले होते. हिमाचलचे प्रेमकुमार धुमल हेच भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते आणि झारखंडात अर्जुन मुंडाच भाजपाचे नेतृत्व करीत होते. पण गंमत बघा कशी आहे. त्यांनी आपल्या पक्षाला बहूमत मिळवून दिले, पण त्यांना आपापल्या जागा जिंकून विधानसभेत पोहोचता आलेले नव्हते. सहाजिकच त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होता आलेले नाही. मग येदीयुरप्पा मुख्यमंत्री होतील काय? म्हणजे मुळात विधानसभेत निवडून येतील काय? नाही आले तर त्यांना मुख्यमंत्री होता येईल काय? भाजपातला हा नवा डावपेच विचित्र अनाकलनीय आहे. त्यावर राजकीय विश्लेषकांनी फ़ारशी कधी चर्चा केलेली नाही. पण त्याचे परिणाम दुरगामी असतात. झारखंडातील व हिमाचल प्रदेशातील राजकारण त्यामुळे किती बदलून गेले आहे ना? मग कर्नाटकात त्याची प्रचिती येणार नाही, असे कोण छातीठोकपणे सांगू शकेल? येदींच्या पुत्राला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे, त्याचा कोणाला अर्थ लागलेला आहे काय? अर्थात निकाल लागल्यावर नवा नेताही येदीयुरप्पांच्या पायावर डोके ठेवून सत्तापदाची शपथ घेऊ शकतो. वेगळा पक्ष काढून मोदींना आपल्या राज्यात संपवायला निघालेले केशूभाई पटेल पराभूत झाल्यावर, शपथविधीपुर्वी मोदींनी त्यांच्याच पाया पडून व त्यांना पेढा खिलवून आपली पंतप्रधान पदाची मोहिम सुरू केलेली नव्हती काय? वेडा बनवून पेढा खाणे, असे अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. पण वेडा बनून पेढा खिलवण्याची ही रणनिती भारतीय राजकारणात नवी आहे. धुमल व अर्जुन मुंडांना पेढा तोंडात पडण्यापर्यंत ती उमजली नव्हती. येदींनाही माहित नाही. मग राहुल सिद्धरामय्यांचे काय? यह तो सिर्फ़ झांकी है. पुरा तमाशा बाकी है, हेच १५ तारखेला निकाल लागतील, तेव्हा अनेकांच्या लक्षात येईल.

6 comments:

  1. Given very different Dimension or aspect...

    ReplyDelete
  2. मस्त ...!! एकदम परिपूर्ण विश्लेषण !!

    ReplyDelete
  3. दोन्ही लेख आवडले!त्यापैकी पहीला तर अप्रतिम(बारामतीकरांवरील)अरविंद नळकांडे

    ReplyDelete
  4. ठिक मान्य आहे..
    वीपक्षा मधिल एकही नेता देशाच्या आर्थिक कल्याणा बाबत बोलत नाही? फक्त मोदींना पाडायचं स्वप्न का पाहतात? तेवढी एकच भाषा का?
    मोदींनी गावा गावात विज पोहचवली, आता संकल्प केला आहे 4 कोटी जनता वीज विरहीत आहे त्यांच्या घरी एका वर्षात वीज पोहचवणार..
    ह्या एका कामाला 70 वर्ष लागू शकतात?
    आम्हाला पुर्वी साध्या साध्या गोष्टींना खुप त्रास दीलाय कांग्रेस ने,
    जनता विसरत नाही.. हा भारत आहे आम्ही 15000 वर्षां पासून ईतिहास वाचतो ह्याच भुमी चा आणि राज्य केलेल्यांचा..

    आपल विश्लेषण ह्याने हे करायला पाहिजे त्याने ते करायला पाहिजे अस ऊपदेशात्मक जाणवलं
    पण
    मतदार म्हणून मी जेव्हा वीचार करतो तेव्हा मला संपूर्ण देश दीसतो सर्वाची परीस्थिती सारखीच दिसते आणि उपाय फक्त मोदीजी च दिसतात..
    🙏

    ReplyDelete
  5. भाऊराव,

    तुम्ही म्हणता तसंच जवळपास घडलंय. कर्नाटकात भाजपने सर्वात जास्त जागा घेतल्यात, पण सरकार बनवण्यात उत्सुक नाहीत.

    लेखात वर्णिल्याप्रमाणे नीती अशी आहे की भ्रष्ट चेहऱ्याचा वापर करून निवडणूक खुशाल जिंकायची, पण त्यात असा काही मोडता घालायचा की भ्रष्ट व्यक्तीस विजयाची फळं चाखता येऊ नयेत. मात्र येदि सावध असल्याने पराभूत झाले नाहीत. अशा वेळेस सरकार न स्थापायचा डावपेच भाजप श्रेष्ठींनी खेळला असावा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete